गडचिरोली जिल्हा तंबाखू-दारुमुक्त करा
By Admin | Updated: July 26, 2015 03:13 IST2015-07-26T03:13:30+5:302015-07-26T03:13:30+5:30
राज्यात सुगंधी तंबाखूबंदी तसेच काही जिल्ह्यांमध्ये दारुबंदी असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.

गडचिरोली जिल्हा तंबाखू-दारुमुक्त करा
अभय बंग यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आराखडा सादर
नागपूर : राज्यात सुगंधी तंबाखूबंदी तसेच काही जिल्ह्यांमध्ये दारुबंदी असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. याच मुद्यावर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांचे सर्वेक्षण करून तयार करण्यात आलेला आराखडादेखील मुख्यमंत्र्यांना सोपविण्यात आला. गडचिरोली जिल्हा हा दारू व तंबाखूमुक्त जिल्हा म्हणून विकास कार्यक्रमांतर्गत एक भाग व्हावा यावर या चर्चेत डॉ. बंग यांनी भर दिला.
हैदराबाद हाऊस येथे सायंकाळी सुमारे अर्धा तास ही चर्चा झाली. राज्यात सुगंधी तंबाखूबंदी आहे. परंतु अनेक ठिकाणी सर्रासपणे नियमांना पायदळी तुडविण्यात येत असल्याचे चित्र आहे. शिवाय वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात दारुबंदी घोषित करण्यात आली आहे. परंतु येथेदेखील नियमांची पूर्ण अंमलबजावणी होत नाही व चोरीछुपे दारुविक्री सुरूच आहे याकडे डॉ.बंग यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये दारुमु्क्ती जाहीर केल्यानंतर ‘सर्च’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानंतर अहवाल तयार करण्यात आला आहे. हा यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सोपविला. दारुबंदीची १०० टक्के प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने ठोस धोरण तयार करणे आवश्यक आहे अशी सूचना त्यांनी केली.
नियमांची अंमलबजावणी करण्यात कर्मचाऱ्यांची संख्या हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु तंबाखू व दारुमुक्तीसाठी केवळ शासनावरच विसंबून न राहता सामाजिक चळवळदेखील उभे राहणे आवश्यक असल्याचे मत यावेळी डॉ. बंग यांनी मांडले.
सोबतच गडचिरोली जिल्हा दारुमुक्त करण्यात आला असला तरी याला तंबाखूमुक्त केल्यास तेथील जनतेचे व विशेषत: महिलांचे आरोग्य सुरक्षित होऊ शकेल. शासनाने सर्व विभागांच्या सहभागासोबतच विविध संस्था तसेच संघटना व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करावा, अशी विनंती डॉ.बंग यांनी मुख्यमंत्र्यांना केली. तंबाखूमुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यासाठी तीन वर्षांचा कार्यक्रम या आराखड्याच्या माध्यमातून बंग यांनी सादर केला.
संबंधित मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले. सोबतच आराखड्याचा सखोल अभ्यास करुन गडचिरोली जिल्हा तंबाखू व दारुमुक्त करण्यासंदर्भात शासनाचे धोरण जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.(प्रतिनिधी)