संघाच्या भविष्यातील योजनाची रूपरेषा ठरणार
By Admin | Updated: March 13, 2015 02:44 IST2015-03-13T02:44:53+5:302015-03-13T02:44:53+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या प्रतिनिधी सभेत सरकार्यवाहांच्या निवड आणि तीन प्रस्तावांवर चर्चा होणार आहे.

संघाच्या भविष्यातील योजनाची रूपरेषा ठरणार
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या प्रतिनिधी सभेत सरकार्यवाहांच्या निवड आणि तीन प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. परंतु सोबतच संघाच्या भविष्यातील योजनांचा आराखडादेखील तयार करण्यात येणार आहे.शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या प्रतिनिधी सभेचे उद्घाटन करतील. यावेळी सहसरकार्यवाह सुरेश सोनी, दत्तात्रेय होसबळे, डॉ. कृष्णगोपाल, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संघटनमंत्री रामलाल, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
नवीन सरकार्यवाहांची निवड १४ किंवा १५ मार्च रोजी होऊ शकते, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली. यावेळी सहप्रचार प्रमुख जी. नंदकुमार, विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अतुल पिंगळे, सहप्रचार प्रमुख अभिजित हरकरे उपस्थित होते.
रामलाल मांडणार भाजपाचा लेखाजोखा
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान भाजपाचे अध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी इतर संघटनांप्रमाणेच भाजपाचा लेखाजोखादेखील संक्षिप्तपणे मांडण्यात येणार आहे. संघटनमंत्री रामलाल हा लेखाजोखा मांडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सभा असून भाजपाशी निगडित कुठल्याही मुद्यावर यात चर्चा होणार नाही, असे संघ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अमित शाह, प्रवीण तोगडिया हे देखील इतर प्रतिनिधींप्रमाणे सभेला उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)