कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यदर्शन शक्य; शवदेखील करता येणार सॅनिटाईज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 01:16 PM2020-09-14T13:16:32+5:302020-09-14T13:17:02+5:30

कमीतकमी आप्तस्वकियांना आपल्या जवळच्या व्यक्तीचे अंत्यदर्शन घेता यावे या विचारातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी संशोधन केले आहे. यामुळे कोरोनाबाधितांचे शव व शवपेटीचे अल्ट्राव्हायोलेट किरणांनी निर्जंतुकीकरण करता येणार आहे.

Funeral of corona bodies possible; Corpses can also be sanitized | कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यदर्शन शक्य; शवदेखील करता येणार सॅनिटाईज

कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यदर्शन शक्य; शवदेखील करता येणार सॅनिटाईज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला असताना मृतांच्या अंत्यसंस्कारादरम्यानदेखील बऱ्याच अडचणी येत आहेत. संक्रमण होऊ नये यासाठी मृतदेहाचे अंत्यदर्शनदेखील घेता येत नसल्याची स्थिती आहे. कमीतकमी आप्तस्वकियांना आपल्या जवळच्या व्यक्तीचे अंत्यदर्शन घेता यावे या विचारातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी संशोधन केले आहे. यामुळे कोरोनाबाधितांचे शव व शवपेटीचे अल्ट्राव्हायोलेट किरणांनी निर्जंतुकीकरण करता येणार आहे.

नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय जानराव ढोबळे, दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक डॉ. नीलेश महाजन व सेवादल महिला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. निरुपमा संजय ढोबळे यांनी एकत्र येऊन हे उपकरण तयार केले आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे अंत्यसंस्कार फक्त सरकारी कर्मचारी किंवा समाजसेवक अथवा तीन ते चार व्यक्ती करीत आहेत. अचानक कोरोनामुळे मृत्यू होतो तेव्हा संबंधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला कुणीच उपस्थित राहत नाही. कोरोनाबाधित मृत व्यक्तीजवळ जाणे योग्य नाही. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती असते शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सोबतच मृतदेहांची ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील धोका असतो. हीच बाब लक्षात घेऊन तिन्ही प्राध्यापकांनी मृतदेहासाठी विशेष कॅबिनेटची निर्मिती केली आहे.

या कॅबिनेटमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या मदतीने मृतदेह किंवा त्याच्यावरील आवरणाचे निर्जंतुकीकरण करता येते. यामुळे त्या मृतदेहाजवळ नातेवाईक, मित्र ठराविक अंतरापर्यंत जाऊन नमस्कार करू शकतात तसेच फुले अर्पण करू शकतात. एवढेच नव्हे तर जी व्यक्ती कर्तव्याने अंत्यसंस्कारासाठी पुढे येते त्यांचा सुद्धा कोरोनापासून बचाव होतो. विविध रसायनांपेक्षा ही प्रणाली जास्त प्रभावी ठरते, असा दावा त्यांनी केला आहे. संशोधकांनी पेटंटसाठीदेखील नोंदणी केली असून एक युनिट मेडिकललादेखील देण्यात आले आहे.

असे काम करते कॅबिनेट
मृतदेहांचे निर्जंतुकीकरण करणारे कॅबिनेट हे स्टेनलेस स्टीलचे बनले असून त्यात अल्ट्राव्हायोलेट लॅम्प लावण्यात आले आहेत. कॅबिनेटच्या वरील व खालच्या बाजूला हे लॅम्प आहेत. मृतदेह ठेवण्यासाठी नेट स्टँड स्ट्रेचर ठेवण्यात आले आहे. लाईट सुरू केल्यानंतर १५ मिनिटांत मृतदेहाच्या बाह्यभागाचे निर्जंतुकीकरण होऊ शकते, असा दावा डॉ.ढोबळे यांनी केला आहे. मृत शरीर उपकरणातून बाहेर काढल्यानंतर पुन्हा उपकरणाचे निर्जंतुकीकरण केले जाते.
 

 

Web Title: Funeral of corona bodies possible; Corpses can also be sanitized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.