खुनातील फरार आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:01+5:302021-02-13T04:10:01+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : शेतात चाैकीदार म्हणून काम करणाऱ्या शेतमजुराचा खून करून पळून गेलेल्या आराेपीला खापा (ता. सावनेर) ...

Fugitive accused in murder arrested | खुनातील फरार आराेपी अटकेत

खुनातील फरार आराेपी अटकेत

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : शेतात चाैकीदार म्हणून काम करणाऱ्या शेतमजुराचा खून करून पळून गेलेल्या आराेपीला खापा (ता. सावनेर) पाेलिसांनी वर्षभरानंतर अटक केली. त्याला मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार अजय मानकर यांनी दिली.

राजाराम काेडवते असे मृताचे तर कलिराम उईके असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. राजाराम काेडवते हा पारशिवनी तालुक्यातील रहिवासी असून, ताे ढकारा शिवारातील संत्र्याच्या बागेत चाैकीदार म्हणून काम करायचा आणि शेताताच राहायचा. कलिराम उईके हा मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असला तरी ताे काही वर्षांपासून खापा परिसरातील शेतात मजूर म्हणून काम करायचा. दाेघांचीही आपसात ओळख हाेती.

दरम्यान, राजाराम काेडवते याचा शेतात मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावरील जखमांंमुळे त्याचा खून केल्याचेही स्पष्ट झाले हाेते. त्यामुळे पाेलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. त्याचवेळी कलिराम उईके मात्र या परिसरातून पळून गेल्याने ताे बेपत्ता हाेता. त्यामुळे पाेलिसांना संशय आला आणि त्यानेच राजारामचा खून केला असावा म्हणून त्याचा शाेध सुरू केला. ताे त्याच्या मूळ गावी पाेतलई, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती मिळताच खापा पाेलिसांच्या पथकाने त्याचे गाव गाठून त्याला गुरुवारी (दि. ११) अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहितीही ठाणेदार अजय मानकर यांनी दिली. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे, प्रमाेद बन्साेड, मंगेश सावरकर, संताेष परतेकी यांच्या पथकाने केली.

...

आधारकार्डमुळे अडकला जाळ्यात

कलिराम हा २५ वर्षांपासून त्याच्या मूळ गावात राहात नसल्याची माहिती पाेलिसांना आधीच मिळाली हाेती. ताे सतत भटकत असल्याने तसेच त्याच्याकडे माेबाईल फाेन, आधारकार्ड व फाेटाे नसल्याने त्याचा शाेध घेण्यास पाेलिसांचा कस लागला. त्याचे शेत तलावात गेल्याने त्याला मध्य प्रदेश शासनाकडून आर्थिक माेबदला मंजूर झाला हाेता. या रकमेची उचल करण्यासाठी त्याला आधारकार्डची आवश्यकता हाेती. त्यामुळे ताे आधारकार्ड काढण्यासाठी १५ फेब्रुवारीला पाेतलई येणार असल्याचेही पाेलिसांना कळले हाेते. मात्र, पाेलिसांनी आधीच त्याचे गाव गाठले आणि ताे दिसताच ताब्यात घेतले.

Web Title: Fugitive accused in murder arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.