Fruits distribution to tired students in Nagpur | जरा हटके! थकल्याभागल्या विद्यार्थ्यांना फळांची भेट

जरा हटके! थकल्याभागल्या विद्यार्थ्यांना फळांची भेट

ठळक मुद्देअनुकरणीय दातृत्व, आरोग्यदायी दानदररोज शाळा सुटल्यावर वाटप


विशाल महाकाळकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळा म्हटली की अभ्यास, वाचन यासोबतच खेळ, धम्माल अन् हल्लागुल्लादेखील आलाच. दिवसभर शाळेत थांबल्यानंतर सायंकाळी घरी जाताना अनेक शाळकरी विद्यार्थी अक्षरश: भुकेने व्याकूळ झाले असतात. आॅटोरिक्षातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तरी ठीक, परंतु शाळेतून पायी किंवा सायकलने घरी जाणाºया विद्यार्थ्यांचे काय! पोटात कावळे ओरडत असताना नाईलाजाने त्यांना भूक दाबावी लागते अन् अनेकदा ही हताशा त्यांच्या चेहºयावर दिसते. हीच बाब लक्षात घेऊन शहरातील रामनगर चौकात एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना नि:शुल्क फळांचे वाटप करण्यात येते. यामुळे बच्चेकंपनीलादेखील तरतरी येते अन् त्यानंतर घराकडे त्यांचे पाय झपाट्याने चालायला लागतात.
रामनगर चौकात देवीलाल जयस्वाल यांचे निवासस्थान आहे. त्या परिसरात अनेक शाळा आहेत. त्यात नावाजलेल्या शाळांसोबतच मनपा शाळांचादेखील समावेश आहे. आजुबाजूच्या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात व अनेक जण पायीच घरी जातात. एकदा ८२ वर्षीय जयस्वाल सहज सायंकाळी घरासमोर उभे असताना त्यांना अक्षरश: थकलेल्या अवस्थेत कसेबसे घराकडे जाणारे काही विद्यार्थी दिसले. त्यांनी सहज त्यांना विचारणा केली असता दुपारी दीड वाजता मधल्या सुटीतील जेवणानंतर काहीच खाल्ले नसल्याने भूक लागल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यातूनच जयस्वाल यांना ही कल्पना सुचली.
दुपारी मधल्या सुटीत डबा खाल्यानंतर अनेक विद्यार्थी त्यानंतर सायंकाळपर्यंत काहीच खात नाहीत. काही विद्यार्थी तर शाळेत डबादेखील नेत नाही. त्यामुळे दिवसभर शाळेत अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटाला पौष्टिक आधार आवश्यक असतो. त्यामुळे त्यांनी घरासमोरच फळवाटपाला सुरुवात केली. यासाठी त्यांनी दोन कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिली असून ते सायंकाळी पाचच्या सुमारास रामनगर चौकात फळे घेऊन उभे राहतात. येणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला एक फळ देण्यात येते.
थकलेल्या विद्यार्थ्यांत उत्साह संचारतो
या उपक्रमाला वर्ष झाले आहे. शाळांतून घरी जाणारे विद्यार्थी स्वत:हून तेथे येतात व तेथील कर्मचारी विनोद पहुरकर व पवन मेश्राम हे त्यांना फळे देतात. अनेक शालेय आॅटोचालकदेखील न चुकता आॅटो तेथे उभा करतात व आॅटोतील विद्यार्थ्यांनादेखील फळ दिले जाते. थकलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहºयावर यानंतर खरोखरच उत्साह संचारल्याचे चित्र दिसून येते.

Web Title: Fruits distribution to tired students in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.