आघाडीत बिघाडीचे संकेत
By Admin | Updated: November 9, 2016 02:59 IST2016-11-09T02:59:01+5:302016-11-09T02:59:01+5:30
महापालिकेची गेली निवडणूक काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून लढवली.

आघाडीत बिघाडीचे संकेत
काँग्रेसला नको राष्ट्रवादीची साथ : राष्ट्रवादीचे मात्र ‘वेट अॅण्ड वॉच’
कमलेश वानखेडे नागपूर
महापालिकेची गेली निवडणूक काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून लढवली. यावेळी मात्र, आघाडीत बिघाडी होण्याची अधिक शक्यता दिसत आहे. राष्ट्रवादीला हात देऊन काहीच फायदा झाला नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे तर काँग्रेसमुळे आम्ही फसलो, अशी राष्ट्रवादीची भावना आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी आघाडी करायचीच नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. मात्र, ५० जागा मिळत असतील तरच आम्ही मैत्रीसाठी तयार आहोत, असे सांगून राष्ट्रवादीने तूर्तास ‘वेट अॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १४५ पैकी ४५ जागांसाठी ताणून धरले होते. शेवटी तीळसंक्रांतीच्या दिवशी गोड शेवट होत आघाडी झाली. २९ जागांवर राष्ट्रवादीने समाधान मानले. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला ६ तर काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचा निकाल २० टक्के तर काँग्रेसचा ३३ टक्के लागला. काँग्रेसच्या यशात लोकमंचचा महत्त्वाचा वाटा होता. यावेळी नगरसेवकांची संख्या १५१ झाली आहे. सहा जागा वाढल्यामुळे राष्ट्रवादीच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे. प्रभागाचा विस्तार मोठा असल्यामुळे निवडणूक वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही. शहरात पक्षाच्या ताकदीची जाणीव असल्यामुळे राष्ट्रवादीचे बहुतांश नेते व कार्यकर्ते आघाडीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेसने किमान ५० जागा सोडाव्या, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, काँग्रेसने राष्ट्रवादीला हलक्यात घेऊ नये. सर्व जागा जिंकण्याची राष्ट्रवादीची ताकद नसली तरी काँग्रेसचे पहेलवान चित करण्याएवढी ताकद नक्कीच आहे. आम्ही शरणागती पत्करणार नाही, अशा रोखठोक भावना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच काँग्रेसशी चर्चा करण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे.
दुसरीकडे काँग्रेस हातमिळवणी करण्याच्या मानसिकतेत नाही. नुकतेच शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीशी आघाडी न करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला व प्रदेश काँग्रेसकडे पाठविला. राष्ट्रवादी आघाडी करताना निवडून येणाऱ्या जागांची मागणी करते. शिवाय सोडलेल्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येत नाहीत. यात काँग्रेसचे नुकसान होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.