पत्नीच्या विरहात सासूच्या घरासमोर जावयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 19:43 IST2019-05-22T19:41:30+5:302019-05-22T19:43:08+5:30
नवीन कामठी येथे पत्नीच्या विरहात जावयाने सासूच्या घरासमोरील झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. श्याम पलटूराम विश्वकर्मा (२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पत्नीच्या विरहात सासूच्या घरासमोर जावयाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कामठी) : नवीन कामठी येथे पत्नीच्या विरहात जावयाने सासूच्या घरासमोरील झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. श्याम पलटूराम विश्वकर्मा (२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवछत्रपती नगर येथील श्याम पलटूराम विश्वकर्मा याचे तीन वर्षांपूर्वी कुंभारे कॉलनी येथील काजल डहाट या तरुणीशी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन वर्षापूर्वी एक मुलगाही झाला. त्यानंतर घरगुती कारणावरुन पती-पत्नीत वादाची ठिणगी पडली. वाद सतत वाढतच गेल्यामुळे दोघेही आपापल्या आईवडिलांकडे राहू लागले. काजलने पती श्याम याला काही न सांगता आपल्या एक वर्षाचा मुलाला एका नातेवाईकाला दत्तक दिला. त्यामुळे पती पत्नीत दररोज भांडण होत होते. श्यामने सोमवारी सासरी जाऊन पत्नीला भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु सासरच्या मंडळींनी श्यामला काजलशी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे श्यामचा राग अनावर झाल्यामुळे पत्नीच्या विरहात त्याने मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास सासूच्या घराशेजारील झाडावर चढून दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली.झाडावर श्याम लटकलेल्या स्थितीत दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिली. यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक विनायक आसटकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यानंतर श्यामचा मृददेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. याप्रकरणी श्यामचा भाऊ अमर याच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.