उपराजधानीने अनुभवले मैत्रीचे ‘मॅजिक’
By Admin | Updated: August 3, 2015 02:50 IST2015-08-03T02:50:12+5:302015-08-03T02:50:12+5:30
मनाला ‘फ्रेशनेस’ देणारं पावसाळी वातावरण...जवळच्या मित्रांची साथ...त्यांचा मैत्रीचा हात...उत्साहाला आलेले उधाण ...

उपराजधानीने अनुभवले मैत्रीचे ‘मॅजिक’
‘फ्रेंडशीप डे’ला यंगिस्तान ‘रॉक्स’ : ‘आॅनलाईन’ कट्टादेखील ‘हाऊसफुल्ल’
नागपूर : मनाला ‘फ्रेशनेस’ देणारं पावसाळी वातावरण...जवळच्या मित्रांची साथ...त्यांचा मैत्रीचा हात...उत्साहाला आलेले उधाण अन् बेधुंद मनाच्या लहरीत चाललेला संवाद, ‘तुझी नी माझी यारी..हीच खरी दुनियादारी!’. ‘हॅप्पी फ्रेंडशीप डे’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. आजच्या युगात‘यंगिस्तान’च्या मैत्रीची परिभाषा झालेला ‘फ्रेंडशीप डे’ने नागपुरात ‘धम्माल’ उडवून दिली. अगदी साधेपणापासून ते फुल्ल फिल्मीस्टाईलपर्यंत निरनिराळ्या पद्धतींनी तरुणाईने मैत्रीचा दिवस साजरा केला.
कुठलाही ‘डे’ उत्साहात साजरा करण्यासाठी शहरात प्रसिद्ध असलेला तेलंगखेडी तलाव परिसर, ट्रॅफिक पार्क, हायकोर्ट रोड, लॉ कॉलेज चौक, सदर, शहरातील निरनिराळे मॉल्स याठिकाणी तर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. रविवार असल्याने साहजिकच हा दिवस साजरा करताना तरुण-तरुणींमध्ये विशेष उत्साह होता. शहरातील हॉटेल्स, रेस्टारंट, कॉफी शॉप्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स इत्यादींमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यात आला.
शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ‘डे’ संस्कृतीमधील हा पहिलाच दिवस असल्यामुळे तरुण-तरुणींमध्ये हा दिवस सेलिब्रेट करताना विशेष उत्साह दिसून येत होता. अनेक तरुण-तरुणींनी शहरातील निरनिराळ्या पब्ज व बड्या हॉटेलकडे धाव घेतली. ‘फ्रेंडशीप बॅश’ चा उत्साह रात्रीपर्यंत ओसंडून वाहत होता.
हा दिवस साजरा करण्यासाठी अनेकांनी आधीच तयारी करून ठेवली होती. त्यांच्या आवडत्या मित्र-मैत्रिणींसाठी फ्रेंडशिप बँड, रिबीन, भेटवस्तू, शुभेच्छापत्र, फोटो फ्रेम्स्, ब्रेसलेट खरेदी करून ठेवले होते. ‘फ्रेंडशिप डे’ला पिवळ्या गुलाबाच्या फुलांना विशेष मागणी असल्याने आज अनेक दुकानेही पिवळ्या गुलाबाच्या फुलांनी सजली होती.(प्रतिनिधी)