लळा लागलेले अंकुर गर्भातच करपले..!
By Admin | Updated: July 1, 2014 00:49 IST2014-07-01T00:49:22+5:302014-07-01T00:49:22+5:30
ज्याच्यावर विश्वास ठेवून जीव ओवाळला, त्यानेच तिला अंधारवाटेवर एकटे सोडून दिले. पोटात वाढणारा गर्भ खुडून टाक, असा सल्ला अनेकांनी दिला. मात्र तो तिला मान्य नव्हता. तिला जगायचं होतं गर्भातील

लळा लागलेले अंकुर गर्भातच करपले..!
प्रियकराने दिला दगा : कुमारी मातेची करुण कहाणी
संतोष कुंडकर - चंद्रपूर
ज्याच्यावर विश्वास ठेवून जीव ओवाळला, त्यानेच तिला अंधारवाटेवर एकटे सोडून दिले. पोटात वाढणारा गर्भ खुडून टाक, असा सल्ला अनेकांनी दिला. मात्र तो तिला मान्य नव्हता. तिला जगायचं होतं गर्भातील अंकुरासाठी ! अब्रुसाठी कुटुंबानेही घराबाहेर काढल्यानंतर तिला चंद्रपुरातील महिला सुधारगृहात आश्रय मिळाला. अशातच जिल्हा शासकीय रुग्णालयात तिचे बाळांतपण झाले. मात्र पोटच्या गोळ्याचे निपचित पडलेलं कलेवर पाहून तिने हंबरडा फोडला. तिचा आक्रोश मन सुन्न करणारा होता. एका दुर्दैवी कुमारी मातेची ही कहाणी संवेदनशील मनाला वेदना देऊन गेली.
चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आंबोली येथील गंगा (काल्पनिक नाव) आणि अंकुश जांभुळे या दोघांमध्ये काही वर्षांपासून प्रेमसंबध होते. आयुष्याच्या एका भावनिक वळणावर तिची अन् त्याची भेट झाली. ओळखीच्या धाग्याने मैत्रीच्या गाठी घट्ट बांधल्या गेल्या अन् या दोघांच्या प्रितीचा सुगंध रानोमाळ दरवळला. तिने त्याच्यावर निरागसपणे सच्चे प्रेम केले. मात्र त्याच्या मनातील स्वार्थ गंगाला ओळखता आला नाही. त्याने तिच्या भोळेपणाचा फायदा घेत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. त्याला जेव्हा हे कळले तेव्हा तो पार बदलून गेला.
गंगाच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाचे पितृत्व नाकारत त्याने लग्न करण्यास सरळ नकार दिला. त्याच्या नकाराने ती अंतर्बाह्य हादरून गेली. पुढे त्याने कामठी येथील एका मुलीशी गुपचूप लग्न करण्याचा घाट घातला. याची खबर मिळताच, गंगाने थेट भिसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची तुरूंगात रवानगी केली.
इकडे तिच्या पोटातील गर्भ वाढत होता. काहींनी तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. मात्र पोटातल्या अंकुरासाठी तिला जगायचं होतं. त्याला जन्म द्यायचा होता. समाजात नाचक्की झाली म्हणून घरच्यांनीही तिला घराबाहेर काढले. पोलिसांच्या मदतीने तिला चंद्रपूरच्या महिला सुधारगृहात ठेवण्यात आले. दोन दिवसांपूर्वी प्रसवकळा सुरू झाल्याने तिला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र तिने मृत बाळाला जन्म दिला अन् क्षणात तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. तिच्या गगनभेदी आक्रोशाने उपस्थितांचीही मने द्रवली.