ताजा भाजीपाला मिळेल दारी
By Admin | Updated: May 30, 2014 01:13 IST2014-05-30T01:13:03+5:302014-05-30T01:13:03+5:30
शेतकर्यांच्या माळ्य़ावरील ताजी भाजी थेट ग्राहकांच्या दारी मिळावी, शिवाय यातून शेतकर्यांना लाभ व्हावा, यासाठी कृषी व पणन विभागाने एक अभिनव प्रयोग हाती घेतला आहे.

ताजा भाजीपाला मिळेल दारी
कृषी विभागाचे फिरते विक्री केंद्र : मुंबई, पुण्यानंतर नागपुरात प्रयोग
जीवन रामावत - नागपूर
शेतकर्यांच्या माळ्य़ावरील ताजी भाजी थेट ग्राहकांच्या दारी मिळावी, शिवाय यातून शेतकर्यांना लाभ व्हावा, यासाठी कृषी व पणन विभागाने एक अभिनव प्रयोग हाती घेतला आहे.
नागपूरच्या सभोवताल मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पिकतो. परंतु तो दलालांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंंंत पोहोचतो. त्यामुळे शेतकर्यांना योग्य भाव मिळत नाही. शिवाय ग्राहकांचीही लूट होते. अशा स्थितीत शेतकर्यांनी स्वत:चा भाजीपाला स्वत:च ग्राहकांपर्यंंत पोहोचवावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी कृषी व पणन विभाग १३ सुसज्जित व्हॅन तयार करीत असून, त्यापैकी पहिली व्हॅन नागपुरात दाखल झाली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत ती शेतकर्यांच्या ताज्या भाजीपाल्यासह ग्राहकांच्या दारावर उभी दिसणार आहे. विशेष म्हणजे, ही व्हॅन खास पद्घतीने तयार केली असून, ती सर्वांंंच्या आकर्षणाचे कें द्र बनली आहे. सोबतच कृषी विभागाने नागपूर विभागात सुमारे ४६८ शेतकरी गट तयार करून, त्यांच्या चार कंपन्या स्थापन केल्या जात आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीचा संपूर्ण व्यवहार चालणार आहे. विशेष म्हणजे, कृषी व पणन विभागाने यापूर्वी ही योजना मुंबई व पुणे येथे राबविली आहे. तेथील ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आता ती नागपुरात राबविली जात आहे.
यात फिरते विक्री केंद्रे व ठिकठिकाणी २८२ किरकोळ भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात शेतकरी गट, बचत गट व बेरोजगार तरुणांना अनुदानावर फिरते विक्री केंद्र व दुकाने दिले जाणार आहेत.
शहरात २८२ विक्री केंद्रे
नागपूर : या योजनेंतर्गत शहरात २८२ सुसज्जित भाजीपाला विक्री केंद्रे तयार केली जाणार आहेत. यात ज्यांच्याकडे अगोदरच दुकाने उपलब्ध आहेत, त्यांना ते दुकान अधिक सुसज्ज करण्यासाठी शासनाकडून १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. तसेच व्हॅन खरेदीसाठी दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या योजनेचा शेतकरी गट, बचत गट व सुशिक्षित बेरोजगार अशा कुणालाही लाभ घेता येणार आहे. केवळ शासकीय अनुदानाचा लाभ घेणार्यांनी शेतकर्यांचाच भाजीपाला खरेदी करून तो विक्री करावा, अशी अट घालण्यात आली आहे. तरी यासाठी इच्छुकांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, पणन विभाग किंवा आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे विभागीय कृषी अधीक्षक आर. बी. चलवदे यांनी आवाहन केले आहे.
वर्षभरात १ कोटी १५ लाखांचा खर्च
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गतवर्षी या भाजीपाला पुरवठा प्रकल्पासाठी नागपूर जिल्ह्याला एकूण १ कोटी १६ लाख २५ हजार रुपयांचे शासकीय अनुदान प्राप्त झाले असून, त्यापैकी १ कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यातून भाजीपाला लागवडीवर ७५ लाख ३७ हजार, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापनावर ६२ हजार, शेडनेट व हरितगृहांवर १९ लाख ९७ हजार, मनुष्यबळ विकास कार्यक्रमांवर एक लाख ६८ हजार, पॅक हाऊस व शितगृह बांधणीवर १७ लाख २२ हजार, प्रतवारी व विक्री केंद्र उभारणीवर २९ हजार आणि प्रकल्प व्यवस्थापन व संनियंत्रणावर २७ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)