माल वाहतूक बंद : नागपुरात  किराणा दुकानात आवश्यक वस्तूंचा साठा संपण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:36 AM2020-03-29T00:36:47+5:302020-03-29T00:37:42+5:30

पूर्वी राज्य शासन आणि नंतर केंद्र शासनाच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर किराणा दुकांनामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साखर, खाद्यतेल, धान्य, कणीक, आटा, मैदा या वस्तूंना जास्त मागणी असल्याने बहुतांश किराणा दुकानातील साठा संपण्याची भीती आहे.

Freight Shutdown: Fear of losing essential commodities at grocery stores in Nagpur | माल वाहतूक बंद : नागपुरात  किराणा दुकानात आवश्यक वस्तूंचा साठा संपण्याची भीती

माल वाहतूक बंद : नागपुरात  किराणा दुकानात आवश्यक वस्तूंचा साठा संपण्याची भीती

googlenewsNext
ठळक मुद्देहोलसेलमधून साखर, खाद्यतेल, आटा यांची आवक घटली

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : पूर्वी राज्य शासन आणि नंतर केंद्र शासनाच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर किराणा दुकांनामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साखर, खाद्यतेल, धान्य, कणीक, आटा, मैदा या वस्तूंना जास्त मागणी असल्याने बहुतांश किराणा दुकानातील साठा संपण्याची भीती आहे. माल वाहतूक बंद असल्याने जिल्हा वा राज्याबाहेरून तसेच होलसेल मार्केटमधून या वस्तूंची आवक बंद असल्याने पुढे या वस्तूंची विक्री करणे शक्य होणार नाही. याकरिता शासनाने मदत करून आवश्यक वस्तूंची माल वाहतूक खुली करण्याची मागणी किराणा दुकानदारांनी केली आहे.
नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, लॉकडाऊन आणि कलम १४४ चे पालन करीत नागपुरातील सर्वच किराणा दुकानदारांनी वाजवी किमतीत जीवनाश्यक वस्तूंची विक्री केली आणि साठा असेपर्यंत करणार आहेत. बैठकांमध्ये जिल्हाधिकारी किराणा दुकाने उघडी ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. साठा असेपर्यंत वस्तूंची विक्री करूच, अन्यथा दुकाने बंद करावी लागतील. लोकांकडून अनावश्यक मागणी वाढली आहे. अनेकांनी दोन-दोन महिन्याच्या किराणा मालाची खरेदी केली आहे. त्यामुळे गरजूंना विक्रीसाठी साठा कमी पडत आहेत. देशात जीवनावश्यक वस्तूंचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, पण बहुतांश ठिकाणी माल वाहतूक थांबल्याने किरकोळ किराणा दुकानात वस्तू पोहोचत नाहीत. याकरिता शासनाने असोसिएशनला मदत करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.
असोसिएशनचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, किराणा दुकानांमध्ये सर्व वस्तूंचा साठा उपलब्ध करून देण्याचे व्यापाऱ्यांचे प्रयत्न आहेत. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडू देणार नाही, याची हमी दुकानदार देत आहेत. होलसेलमधून माल मागविण्यात येत आहे. पण त्यांच्याकडे उपलब्ध असलेला माल आम्हाला पाठवत आहेत. माल वाहतूक बंद असल्याने वस्तू शहरात आलेल्या नाहीत. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची माल वाहतूक सुरू ठेवावी.
इतवारी तेल असोसिएशनचे अध्यक्ष राजूभाई ठक्कर म्हणाले, गुजरात आणि अन्य राज्यांतून शेंगदाणा आणि सोयाबीन कच्च्या तेलाची आवक बंद असल्याने खाद्यतेलाचा पॅकिंग कारखाना बंद केला आहे. आमचे स्वाद ब्रॅण्ड तेल साठा असेपर्यंत विकले. पण आता पॅकिंग बंद असल्याने तेलाची विक्री शक्य नाही. शासनाने पासेसची व्यवस्था करून आवश्यक माल वाहतूक खुली करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीत केली आहे. याकरिता जिल्हाधिकारीही सकारात्मक आहेत. कच्चा माल पोहोचल्यास पॅकिंग करून खाद्यतेल बाजारात उपलब्ध करून देऊ. कमतरता भासू देणार नाही.
गिन्नी अ‍ॅग्रोचे संचालक गोविंद मंत्री म्हणाले, कणीक, आटा, मैदा गिन्नी ब्रॅण्ड नावाखाली बाजारात उपलब्ध करून देण्यात येत आहे. कुठलीही कमतरता पडू देणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. युनिटमध्ये अर्धेच कर्मचारी असल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. पावसामुळे गहू ओला झाला आहे. त्यामुळे खरेदी थांबली आहे. पण उपलब्ध कच्च्या मालापासून फिनिश माल तयार करण्यात येत आहे. लोकांची मागणी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे.

Web Title: Freight Shutdown: Fear of losing essential commodities at grocery stores in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.