फुकट्या जाहिरातीमुळे शहर विद्रुप()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST2021-01-13T04:16:41+5:302021-01-13T04:16:41+5:30
फुकट्या जाहिरातीमुळे शहर विद्रुप() शहराच्या सर्व भागांत अवैध होर्डिंग : मनपाच्या महसुलालाही फटका लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट ...

फुकट्या जाहिरातीमुळे शहर विद्रुप()
फुकट्या जाहिरातीमुळे शहर विद्रुप()
शहराच्या सर्व भागांत अवैध होर्डिंग : मनपाच्या महसुलालाही फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. सिमेंट रोड, चौकांचे सौंदर्यीकरण, मेट्रो रेल्वे यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे; परंतु दुसरीकडे अवैध होर्डिंगमुळे शहर विद्रुप होत असून महापालिकेच्या महसुलाही फटका बसत आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वाढदिवस, नियुक्तींचे होर्डिंग सर्वत्र झळकत असतात. कोचिंग क्लासेस, खासगी संस्थांच्या अवैध होर्डिंगमुळे शहरातील चौक, रस्ते विद्रुप होत आहेत. याला वेळीच आळा घालण्याची गरज आहे.
अवैध होर्डिंगवर कारवाई करण्याची जबाबदारी मनपाच्या झोन स्तरावरील अधिकाऱ्यांची आहे; परंतु कठोर कारवाई होत नसल्याने व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात सर्वत्र अवैध होर्डिंग दिसतात. शहरातील चौक, रस्त्यांवरील झाडे एवढेच नव्हे, तर वाहतूक सिग्नलवरही अवैध होर्डिंग लावले जातात. अवैध होर्डिंग लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्यास मनपाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होऊ शकतो.
....
झोन स्तरावरील कारवाईला मर्यादा
अवैध होर्डिंग, बॅनर विरोधात मनपाच्या झोन कार्यालयामार्फत कारवाई केली जाते; परंतु होर्डिंग राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वा नगरसेवकांचे असल्याने याची दखल घेतली जात नाही. कारवाईला मर्यादा आहेत. याचा विचार करता अवैध होर्डिंगसंदर्भातील कारवाईची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना यासाठी दोषी धरल्यास अवैध होर्डिंगला आळा बसू शकतो.
...
होर्डिंगच्या माध्यमातून ६.५० कोटी
मनपाला होर्डिंगच्या माध्यमातून कर स्वरूपात वर्षाला जवळपास ६.५० कोटींचा महसूल प्राप्त होतो. अवैध होर्डिंगला आळा बसल्यास या महसुलात वाढ होऊ शकते. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
...
झोन स्तरावर नियमित कारवाई
सार्वजनिक ठिकाणी मनपाची परवानगी न घेता लावण्यात येणाऱ्या अवैध होर्डिंगवर झोन स्तरावर कारवाई केली जाते. झोन कार्यालयांना अवैध होर्डिंगवर नियमित कारवाई करण्याच्या सूचना केल्या केल्या आहेत. तक्रार असल्यास तातडीने कारवाई केली जाते.
मिलिंद मेश्राम, उपायुक्त (महसूल) मनपा.