कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:07+5:302021-02-06T04:14:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कॅन्सल चेकला बेअरर बनवून कर्जदाराचे १ लाख, ३६ हजार रुपये हडपल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी इंडसइंड ...

Fraud under the pretext of lending | कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कॅन्सल चेकला बेअरर बनवून कर्जदाराचे १ लाख, ३६ हजार रुपये हडपल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी इंडसइंड बँकेच्या व्यवस्थापकासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शुभम गुप्ता, अंकित जयस्वाल, संजय गुप्ता, माधुरीथोटे, पंकज साहू आणि एम. जे. साजिद अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी अमित मोहनराव गव्हाणकर (रा. जयंतीनगरी मनीषनगर) यांना ६ नोव्हेंबर २०२० ला कथित शुभम गुप्ता, अंकित जयस्वाल आणि एम. जे. साजिद यांचा फोन आला. स्वत:ला इंडसइंड बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगून त्यांनी अमितला कर्ज हवे का, अशी विचारणा केली. हो म्हणताच आरोपींनी त्यांच्याकडून कर्जाची मागणी करणारा अर्ज, कागदपत्रे आणि १४९ रुपयांचा चेक घेतला. हा चेक कॅन्सल करू, अशी थाप मारून आरोपींनी त्या चेकवर पद्धतशीर खाडाखोड केली आणि त्यावर १ लाख, ३६ हजार, ५०० रुपयांची रक्कम कथित संजय गुप्ताच्या नावावर उचलून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अमित गव्हाणकर यांनी चौकशी केली असता कर्ज देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी बँक व्यवस्थापकाकडे चाैकशी केली असता त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. त्यामुळे अमित यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----

बँक अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा

विशेष म्हणजे, १ लाख रुपयांच्या वरचे पेमेंट करताना बँक अधिकाऱ्यांनी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, बँक व्यवस्थापक साहू आणि थोटे यांनी कमालीचा निष्काळजीपणा दाखवला. चेक क्लियर करताना संजय गुप्ताने अमित गव्हाणकरच्या नावाखाली दुसऱ्याच कुणाशी बोलणी करून दिली आणि बँक अधिकाऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवून चेक पेमेंट केले. मुळे त्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी त्यांनाही आरोपी केले. या प्रकरणात पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींना शोधण्याचे प्रयत्न करीत असल्याचे सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस यांनी सांगितले.

-----

Web Title: Fraud under the pretext of lending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.