अधिकाऱ्यांच्या नावाने फसवणुकीचे रॅकेट : मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर मुलाखत अन् बोगस नियुक्तिपत्र
By योगेश पांडे | Updated: June 20, 2025 13:02 IST2025-06-20T12:58:00+5:302025-06-20T13:02:10+5:30
फसवणुकीचे रॅकेट : मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने नागपुरातील बंटी-बबलीकडून गंडा

Fraud racket in the name of officials: Interview and bogus appointment letter on the fifth floor of the ministry
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सुरू असलेल्या एका फसवणुकीच्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे नाव घेत उमेदवारांना गंडा घातला. आरोपींची हिंमत इतकी वाढली की त्यांनी चक्क पीडित व्यक्तींना मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर नेऊन तेथे एका तथाकथित अधिकाऱ्याची भेट घालून देत मुलाखतीचा फार्सदेखील पार पाडला. २०२० ते २०२२ या कालावधीत रचण्यात आलेले हे रॅकेट आता उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोपींनी अनेकांना कोट्यवधींनी गंडा घातल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सुरेश भय्यालाल धमगाये (४१, गोरेवाडा वस्ती) यांच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला आहे. लॉरेन्स मारीदास हेनरी (आनंद नारायण अपार्टमेंट, मानेवाडा रिंग रोड), त्याची पत्नी शिल्पा हेनरी, विजय विनायकराव पाटणकर (कळमना मार्ग, श्रीराम चौक) व नितीन साठे अशी आरोपींची नावे आहेत. एका मित्राच्या माध्यमातून धमगाये यांची लॉरेन्ससोबत भेट झाली होती. लॉरेन्सने तो नेक्सस एच आर सोल्युशन्स ही जॉब प्लेसमेन्ट एजन्सी चालवत असल्याचे तसेच मंत्री कोट्याअंतर्गत नोकरी लावून देण्याचे काम करत असल्याची बतावणी केली होती. सहा महिन्यांत सरकारी नोकरी लावून देण्याचे त्याने आमिष दाखविले व त्याबदल्यात १२ लाखांची मागणी केली. धमगाये यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून ६.८९ लाख रुपये त्याला दिले. लॉरेन्सने मंत्रालयात नितीन साठे नावाचा सचिव दर्जाचा अधिकारी मित्र असल्याचा दावा केला. त्यानंतर मंत्रालयात मुलाखत असल्याचे सांगत धमगाये यांना मुंबईत बोलविले. आरोपीने त्यांना मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर नेत तेथील रेकॉर्ड रूममध्ये साठे नावाच्या तथाकथित अधिकाऱ्याशी भेट घालून दिली. साठेने तेथे त्यांची मुलाखत घेण्याचे नाटक केले. मात्र, बराच कालावधी उलटूनदेखील आरोपींनी कुठलीही नोकरी लावून दिली नाही. त्यामुळे धमगाये यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. धमगाये यांना त्याने केवळ दोन लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. अखेर धमगाये यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस नियुक्तिपत्रदेखील केले तयार
आरोपींनी आरोपींनी काही दिवसांत नियुक्तिपत्र मिळेल असे सांगत थमगाये यांना पैसे मागितले. आरोपींनी धमगाये यांना त्यांचे नियुक्तिपत्रदेखील दाखविले व त्यानंतर शारीरिक चाचणी द्यायची असल्याचे सांगितले.