नागपुरात मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली २५ लाखांची फसवणूक

By योगेश पांडे | Updated: May 4, 2025 16:04 IST2025-05-04T16:04:54+5:302025-05-04T16:04:54+5:30

कुख्यात परिमल कोतपल्लीवारविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

Fraud of Rs 25 lakhs in the name of medical admission in Nagpur | नागपुरात मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली २५ लाखांची फसवणूक

नागपुरात मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली २५ लाखांची फसवणूक

नागपूर : मेडिकल प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली आर.के.एज्युकेशन कॉन्सिलिंगचा संचालक परिमल कोतपल्लीवारने आणखी एका पालकाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हिवरी ले आऊटमधील एका पालकाला वैद्यकीय प्रवेश मिळवून देतो असे म्हणून त्याने तब्बल २५ लाखांनी फसवणूक केली. कोतपल्लीवारविरोधात काही वर्षांअगोदर सीबीआयनेदेखील देशपातळीवरील मेडिकल प्रवेश महाघोटाळ्यात कारवाई केली होती. मात्र त्याच्याविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने त्याचा गोरखधंदा सुरूच आहे.

भास्कर नावाच्या व्यक्तीच्या मुलीला एमबीबीएसमध्ये प्रवेश घ्यायचा होता. कोतपल्लीवार प्रवेश मिळवून देतो अशी त्यांना माहिती मिळाली. त्यांनी टेलिफोन एक्सचेंज चौकातील गांधी ग्रेन मार्केट येथील थावलानी इमारतीतील आर.के.एज्युकेशन कॉन्सिलिंगचे कार्यालय गाठले. तेथे त्यांनी परिमल चंद्रशेखर कोतपल्लीवार (श्रद्धा कॉम्प्लेक्स, रमना मारोती, पवनसुतनगर) याच्याशी संपर्क केला. परिमलने भास्कर यांच्या मुलीचा चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करून देतो असा दावा केला. त्याने १५ ऑक्टोबर २०२२ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत त्यांच्याकडून २५ लाख रुपये उकळले. त्याच्यासोबत त्याची पत्नी रुपाली, मिलींद रमेश धवड (जुनी शुक्रवारी, कोतवाली), नितीन भगवान बल्लमवार (विद्यानगर) हेदेखील होते. मात्र भास्कर यांच्या मुलीचा प्रवेश झालाच नाही. त्यांनी परिमलला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. भास्कर यांनी पैसे मागितले असता तो टाळाटाळ करू लागला. अखेर त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी परिमलसह चारही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Fraud of Rs 25 lakhs in the name of medical admission in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.