उजळायला दिलेली सोन्याची साखळी साफ, वृद्ध महिलेची फसवणूक
By दयानंद पाईकराव | Updated: August 16, 2023 19:54 IST2023-08-16T19:54:21+5:302023-08-16T19:54:28+5:30
अंबाझरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४०६, ४२० नुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे.

उजळायला दिलेली सोन्याची साखळी साफ, वृद्ध महिलेची फसवणूक
नागपूर: सोन्याचे दागीने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या अनेक घटना शहरात घडल्यानंतरही नागरिक अशा भामटयांवर विश्वास ठेवत आहेत. सोमवारी १४ ऑगस्टला चार आरोपींनी सोन्याची चेन पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका ८० वर्षाच्या वृद्ध महिलेची फसवणूक करून ५० हजाराची सोनसाखळी चोरून नेली.
कमल श्रीकृष्ण कुळकर्णी (वय ८०, रा. प्लॉट नं. १९, पंचशील वाचनालयाजवळ, यशवंतनगर) असे फसवणूक झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. सोमवारी १४ ऑगस्टला दुपारी १२ वाजता त्या घरी असताना २५ ते ३० वयोगटातील चार अनोळखी व्यक्ती त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी आपण तांबे, पितळी भांडे व दागीने पॉलिश करून देत असल्याचे सांगून कमल यांचा विश्वास संपादन केला. कमल यांनी आपल्या घरातील एक पितळाचा डबा व त्यासोबत १० ग्रॅम सोन्याची चेन किंमत ५० हजार रुपये आरोपींना दिली.
आरोपींनी कमल यांना एक पुडी देऊन त्यात पॉलिश केलेली १० ग्रॅम सोन्याची चेन असल्याचे सांगितले. कमल यांनी २० मिनिटांनी पुडी उघडून पाहिली असता त्यात सोन्याच्या चेन ऐवजी बारीक खडे असल्याचे आढळले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४०६, ४२० नुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे.