नागपुरात इंदूरच्या उद्योजकाकडून फसवणूक , सहा लाख रुपये हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 21:22 IST2020-11-07T21:19:52+5:302020-11-07T21:22:42+5:30
Fraud from Indore businessman, crime news सव्वाकोटीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर एका स्थानिक उद्योजकाची मध्य प्रदेशमधील उद्योजकाने अवघ्या सहा लाखासाठी फसवणूक केली.

नागपुरात इंदूरच्या उद्योजकाकडून फसवणूक , सहा लाख रुपये हडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सव्वाकोटीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर एका स्थानिक उद्योजकाची मध्य प्रदेशमधील उद्योजकाने अवघ्या सहा लाखासाठी फसवणूक केली. याप्रकरणी गौरव जैन नामक इंदूरच्या एका उद्योजकावर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गगनदीपसिंग जगतारसिंग सेठी (वय ४१) यांचा एमआयडीसीत कारखाना आहे. त्यांना स्टील प्लेट आणि स्ट्रक्चरची आवश्यकता असल्याने, त्यांनी जून २०१८ मध्ये इंदूर(मध्य प्रदेश)मधील गौरव जैनच्या कंपनीला १ कोटी ३१ लाखाची ऑर्डर दिली. त्यानुसार त्यांना २५ लाखाचे पाच तर ६ लाख ३५ हजार ५५ रुपयाचा सहावा चेक देण्यात आला. दोन महिन्यात ऑर्डर पूर्ण करण्याचा करार ठरला. त्यानुसार माल देण्याघेण्याचा व्यवहार पूर्ण झाला. सेठींनी जैनला मालाची रक्कम आरटीजीएस केली. ठरल्याप्रमाणे आधी दिलेले चेक परत करण्याऐवजी जैन याने ६ लाख ३५ हजाराचा चेक वटविण्यासाठी बँकेत जमा केला. हा विश्वासघात असल्याची तक्रार सेठी यांनी एमआयडीसी ठाण्यात नोंदवली. २९ ऑगस्टपासून त्याची चौकशी सुरू झाल्यानंतर जैन याच्याविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.