शिक्षण संस्थेच्या सचिवाची बनवाबनवी : शासनाला १.२८ लाखाचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 23:04 IST2019-03-07T23:04:06+5:302019-03-07T23:04:42+5:30
शिक्षण संस्थेच्या सचिवाने बनावट नियुक्ती दाखवून शासनाचे १ लाख २८ हजार रुपये हडपले. तब्बल १७ वर्षांनंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रहमान खान (वय ६८) असे आरोपीचे नाव आहे. ते पोलीस लाईन टाकळीच्या बाजूला असलेल्या राठोड लेआऊटमध्ये राहतात.

शिक्षण संस्थेच्या सचिवाची बनवाबनवी : शासनाला १.२८ लाखाचा चुना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण संस्थेच्या सचिवाने बनावट नियुक्ती दाखवून शासनाचे १ लाख २८ हजार रुपये हडपले. तब्बल १७ वर्षांनंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रहमान खान (वय ६८) असे आरोपीचे नाव आहे. ते पोलीस लाईन टाकळीच्या बाजूला असलेल्या राठोड लेआऊटमध्ये राहतात.
सक्करदऱ्यातील सुभेदार लेआऊटमध्ये शादाभ एज्युकेशन सोसायटी आहे. या संस्थेचे सचिव म्हणून रहमान खान कार्यरत होते. संस्थेमार्फत संचालित एचबीटी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात खान यांनी १ मार्च २००० ला पी. टी. राठोडची शिपाई म्हणून नियुक्ती दाखविली. तो कार्यरत नसतानादेखील त्याच्या नावाने १ जुलै २००२ या सव्वादोन वर्षांच्या कालावधीत पगार आणि इतर खर्चापोटी १ लाख २८ हजार ३०६ रुपये शासकीय तिजोरीतून उचलले. त्यानंतर या संस्थेचे संचालक मंडळ बदलले. मात्र, बोगस शिपाई नियुक्तीचा प्रकार कुणाच्याच लक्षात आला नाही. अलीकडे संचालक मंडळाच्या लक्षात हा गैरप्रकार आला. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवली. शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर या तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्याने, नागपूर विभागाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. अर्चना नेरकर यांनी सक्करदरा पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी केली. त्यानंतर खान यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.