फ्रान्सच्या ‘डसॉल्ट’ची ‘डीआरएएल’मध्ये बहुसंख्य भागीदारी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 7, 2025 20:39 IST2025-09-07T20:39:29+5:302025-09-07T20:39:45+5:30

नागपुरातील मिहानमध्ये प्रकल्प : संयुक्त उपक्रमातील २ टक्के हिस्सा विकण्याचा रिलायन्सचा निर्णय, करार ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

France's Dassault has a majority stake in DRAL | फ्रान्सच्या ‘डसॉल्ट’ची ‘डीआरएएल’मध्ये बहुसंख्य भागीदारी

फ्रान्सच्या ‘डसॉल्ट’ची ‘डीआरएएल’मध्ये बहुसंख्य भागीदारी

- मोरेश्वर मानापुरे

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने ‘डीआरएएल’मधील (डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड) २ टक्के भागभांडवल फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनला विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘डीआरएएल’मध्ये डसॉल्ट आता ५१ टक्के बहुसंख्य भागीदार, तर रिलायन्सची भागीदारी ४९ टक्के होईल. हा करार ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

नागपूरच्या मिहान प्रकल्पात फाल्कन-२००० बिझनेस जेट विमानाचे उत्पादन करण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर डसॉल्टने ‘डीआरएएल’ला फाल्कन विमानांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतल्याने, कंपनीला बहुसंख्य भागीदारी आवश्यक होती. या निर्णयामुळे फ्रान्सच्या बाहेर प्रथमच डसॉल्ट कंपनी विमान निर्मिती करणार असून, भारतात विदेशी विमान निर्मात्याची ही पहिलीच फायनल असेंब्ली लाईन (एफएएल) ठरणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंबानी यांचा डसॉल्टमधील आणखी हिस्सा विक्रीसाठी खुला राहू शकतो. मिहानमधील नागपूरच्या कारखान्यात सध्या फाल्कन-२००० चे विविध पार्ट तयार होत आहेत. तर, ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेतून तयार होणारे पहिले फाल्कन-२००० जेट २०२८ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. ही विमाने भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढत्या मागणीची पूर्तता करतील.

दरम्यान, रिलायन्स समूहाने हा करार झाल्याची माहिती सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला (‘सेबी’) दिली असून, विशेष म्हणजे या काळात कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाच्या (इडी) चौकशीची कारवाई सुरू आहे. तथापि, हिस्सेदारी विक्रीचे नेमके कारण रिलायन्सने स्पष्ट केलेले नाही. मात्र, नागपूरच्या मिहान प्रकल्पातून सुरू होणारे हे उत्पादन विमान उद्योगात भारतासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.

Web Title: France's Dassault has a majority stake in DRAL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.