सावनेर/सिंगोरी - वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा आणि धामणगाव शिवारात बुधवारी (दि. २७) दुपारी घडली. धापेवाडा (ता. कळमेश्वर)शिवारातील शेतात पहाटीला खत देणाऱ्या आईसह तरुण मुलगा आणि मजूर महिलेचा तर धामणगाव (ता. मौदा) शिवारात पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली आश्रय घेतलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.
वंदना प्रकाश पाटील (३९), ओम प्रकाश पाटील (२२), निर्मला रामचंद्र पराते (६५), तिघेही रा. वॉर्ड क्रमांक-३, धापेवाडा, ता. कळमेश्वर आणि सागर पंढरी जुमडे (२७, रा. धामणगाव, ता. मौदा) अशी मृतांची नावे आहेत. प्रकाश शंकर पाटील यांचे धापेवाडा शिवारात शेत आहे. वंदना, ओम आणि निर्मला यांच्यासह अन्य चार महिला शेतातील पहाटीला खत देत होते. तिघे शेताच्या मध्यभागी होते तर चार महिला शेताच्या धुन्ऱ्याजवळ होत्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
गणपतीच्या स्थापनेपूर्वीच..वंदना पाटील या दरवर्षी गणपती बसवितात. ओम गणपतीची मूर्ती आणण्यासाठी कळमेश्वरात गेला होता. तो दुपारी २ वाजेच्या सुमारास मूर्ती घेऊन घरी आला आणि लगेच आईला मदत करण्यासाठी शेतात गेला. तो आईसोबत झाडांना खत देत असताना काळाने झडप घातली.
झाडाचा आश्रय जिवावर बेतला सागर जुमडे हा बुधवारी सायंकाळी कढोली येथून धामणगावला येत होता. गावाजवळ पोहोचताच पावसाला सुरुवात झाली आणि त्याने रोडलगतच्या झाडाखाली आश्रय घेतला. त्यातच जोरात कडाडलेली वीज झाडावर कोसळली आणि सागर होरपल्याने गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. या घटनेमुळे धामणगावात शोककळा पसरली होती.