नवोदय बँक घोटाळ्यात आणखी चार आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:58 PM2019-06-21T23:58:18+5:302019-06-21T23:59:54+5:30

नवोदय बँक घोटाळ्यात आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Four more accused in Navodaya Bank scam arrested | नवोदय बँक घोटाळ्यात आणखी चार आरोपी गजाआड

नवोदय बँक घोटाळ्यात आणखी चार आरोपी गजाआड

Next
ठळक मुद्देअटकेतील आरोपींची संख्या सहा : न्यायालयातून पाच दिवसांचा पीसीआर मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदय बँक घोटाळ्यात आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. मनमोहन तिलकराज हिंगल (वय ६३), शिवम मनमोहन हिंगल (वय २९, रा. दगडी पार्क, रामदासपेठ), नीती अमित पाटकर (वय ३८, रा. मनीषनगर) आणि अनंत रामचंद्र दक्षिणदास (वय ६४, रा. सोमनाथ अपार्टमेंट, धरमपेठ)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी शुक्रवारी विशेष न्यायाधीश श्री पाटील यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा ७ दिवसाचा पीसीआर देण्याची मागणी केली. जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी पीसीआरची आवश्यकता पटवून देताना गुन्ह्यासंदर्भात महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस आणायच्या असल्याचे सांगितले. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपींचा पाच दिवसाचा पीसीआर मंजूर केला.
माजी आमदार अशोक धवड व्यवस्थापकीय संचालक असलेल्या या बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयाचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलीस ठाण्यात १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी मंगळवारी रात्री आरोपी राजेश श्रीधर बांते (४३) व राजेश मल्लेशाम बोगुल (३८)या दोघांना अटक केली होती. हे दोघेही बँकेमध्ये व्यवस्थापक होते. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक फुलपगारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आणखी काही लवकरच गजाआड
अशोक धवड यांच्यासह बँक संचालिका किरण धवड, संचालक विजय जोशी, गोविंद जोशी, मुकेश जोशी, राकेश जोशी, विकेश जोशी, प्रकाश शर्मा, सचिन मित्तल, प्रीती मित्तल, बालकिशन गांधी, लीना गांधी, हिंगल ग्रुप, झाम ग्रुप, ग्लॅस्टोन ग्रुप, सिगटिया ग्रुप, देवघरे बिल्डर्स, सोमकुवर ग्रुप, गुलरांधे ग्रुप, पिरॅमिड ग्रुप व ३० कर्जदारांची या घोटाळ्यात काय भूमिका आहे याचाही पोलीस तपास करीत आहेत. काही जणांना पुढच्या काही तासातच अटक केली जाऊ शकते, असे संकेत आहेत.

Web Title: Four more accused in Navodaya Bank scam arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.