नागपुरात विना विमा चार लाखावर दुचाकी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 23:26 IST2020-12-21T23:24:22+5:302020-12-21T23:26:44+5:30
Four lakh uninsured two-wheelers on the road, nagpur news शहरात १४ लाख ७४ हजार ३९९ दुचाकींची संख्या आहे. यातील जवळपास चार लाखावर अधिक दुचाकींचा विमा नसतानाही त्या रस्त्यावर धावत असल्याची माहिती आहे. ज्या वाहनचालकांनी बँकेचे कर्ज घेऊन दुचाकी विकत घेतली ते कर्ज असेपर्यंत या दुचाकीचा विमा काढण्यात येतो, मात्र बँकेचे दुचाकीवरील कर्ज संपताच दुचाकीचा विमा काढण्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.

नागपुरात विना विमा चार लाखावर दुचाकी रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात १४ लाख ७४ हजार ३९९ दुचाकींची संख्या आहे. यातील जवळपास चार लाखावर अधिक दुचाकींचा विमा नसतानाही त्या रस्त्यावर धावत असल्याची माहिती आहे. ज्या वाहनचालकांनी बँकेचे कर्ज घेऊन दुचाकी विकत घेतली ते कर्ज असेपर्यंत या दुचाकीचा विमा काढण्यात येतो, मात्र बँकेचे दुचाकीवरील कर्ज संपताच दुचाकीचा विमा काढण्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.
शहर आरटीओ कार्यालयांतर्गत सर्व प्रकारची वाहने मिळून १३ लाख ५४ हजार १७४ वाहने आहेत. तर पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत ४ लाख ४४ हजार ६५७ अशी एकूण १७ लाख ९८ हजार ८३१ वाहने आहेत. मात्र ही वाहने आरटीओ कार्यालयाच्या स्थापनेपासूनची आहेत. यामुळे यातील किती वाहने मोडकळीस निघाली असतील आणि किती वाहने रस्त्यावर असतील, याची माहिती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, एकूण वाहनाच्या तुलनेत सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत. शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ११ लाख ३ हजार तर, पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत ३ लाख ४४ हजार ३९६ दुचाकी आहेत. दोन्ही आरटीओ कार्यालये मिळून कारची संख्या १ लाख ६४ हजार ९८५ आहेत. ट्रकची संख्या १६ हजार ९८६, स्कूल बसची संख्या १ हजार ८७३ आहे. तज्ज्ञानुसार, बहुसंख्य चारचाकी वाहनांचे मालक नियमित विमा काढतात. परंतु दुचाकी वाहनांचा विमा काढण्यास अनेक चालक दुर्लक्ष करतात. वाहनचालक विमा काढतात किंवा नाही यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचा वॉच असतो. मात्र लाखो वाहनांची तपासणी करणे त्यांनाही मोठ्या अडचणीचे असते. याचा फायदा घेत, वाहनचालक विमा काढण्याकडे पाठ करतात. वाहनांचा विमा नसताना अपघात झाल्यास याचे परिणाम भयंकर आहेत. परंतु दुचाकी चालक यासंदर्भात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. चार लाखापेक्षा अधिक दुचाकीचा विमा नसल्याची प्राथमिक माहिती असली तरी यापेक्षा जास्त संख्या असण्याची शक्यता आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या चारचाकी वाहनांचाही विमा काढण्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
विमा नसल्याचे धोके
एखाद्या वाहनाचा विमा नसतानाही ते वाहन रस्त्यावर चालत असेल आणि अशात अपघात झाल्यास वाहनचालकाला मोठा भुर्दंड बसण्याची शक्यता असते. यासोबतच न्यायालयात खटला चालल्यानंतर दोषी आढळल्यास शिक्षा होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे विमा न काढताच वाहन चालविण्याचे संभाव्य धोके जास्त आहे. वाहनचालकांनी विमा असतानाच वाहन चालवावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.
वाहनाचा विमा नसताना वाहन रस्त्यावर चालविणे दंडनीय अपराध आहे. त्यामुळे कोणत्याही वाहनचालकाने असा प्रकार करू नये. वाहतूक विभागाकडून अशा वाहनांवर वारंवार कारवाई करण्यात येते. वाहन तपासणीत विमाही पाहिला जातो.
- सारंग अव्हाड, उपायुक्त पोलीस (वाहतूक)