नागपुरात चार बांगलादेशी घुसखोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:38 IST2018-08-26T00:36:42+5:302018-08-26T00:38:24+5:30
भारतात घुसखोरी करून येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना विशेष शाखेच्या पथकाने अटक केली. या चारपैकी एकाचे संबंध बांगलादेशातील दहशतवादी संघटनेशी असल्याची संशयवजा माहिती पोलिसांना मिळाल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

नागपुरात चार बांगलादेशी घुसखोरांना अटक
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात घुसखोरी करून येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना विशेष शाखेच्या पथकाने अटक केली. या चारपैकी एकाचे संबंध बांगलादेशातील दहशतवादी संघटनेशी असल्याची संशयवजा माहिती पोलिसांना मिळाल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
बांगलादेशी घुसखोरांनी मोठ्या संख्येत भारतात प्रवेश केला असून ते विविध शहरात वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदा वास्तव्य करीत असल्याची माहिती विशेष शाखेला दोन महिन्यांपूर्वी मिळाली. या महितीच्या आधारे विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे सहायक निरीक्षक ए. एस. फर्नांडिस, ज्ञानेश्वर उराडे, हवलदार श्यामकुमार कुलमते, हरीदास, दुर्याेधन रमेश, रविशंकर, संतोष, सलीम, सुनिता. ज्ञानेश्वर भोगे, कमलाकर भंगाळे आदींनी अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी करून गिट्टीखदान, सुरेंद्रगडमधील गांधी पुतळ्याजवळच्या दीनानाथ निखारे यांच्याकडे भाड्याने राहणाºया चौघांच्या हालचालींवर नजर ठेवली. त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे रॉकी विमल बरूवा ऊर्फ रॉकी चौधरी (वय २६, मूळ पत्ता शहाबीनगर, बरुआपारा, रांगोनिया, जि. चिंत्ताग्राम, बांगलादेश), सुदर्शन नयन बरूवा ऊर्फ नयनसुमन तालुकदार अनंतमोहन (वय ३०, रा. शेगाटा धोपाचुरी, त. शतकानी. जि. चट्टाग्राम, बांगलादेश), विप्लब शिशिर बरूवा ऊर्फ विप्लब शिशिर तालुकदार (वय ३४, रा. शिरकुब, मोकिंचर माब्कली, जि. खटकग्राम, बांगलादेश) आणि प्रदीप चित्तरंजन बरूवा ऊर्फ नंदप्रिय तपन बरूवा (वय २८, रा. पुट्टीविला एमसरहाट, लोहागडा, जि. चट्टग्राम, बांगलादेश) यांना २३ आॅगस्टच्या सकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी कागदपत्रे जप्त केली. त्यातून धक्कादायक माहिती उघडकीस आल्याची वरिष्ठ पोलीस सूत्रांची माहिती आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाºयाने सांगितलेल्या माहितीनुसार, उपरोक्त चौघांपैकी एकाचे संबंध बांगलादेशमधील ‘अन्सारउल बांगलादेश टीम (एबीटी)’ शी असल्याचा संशय आहे. तशी काही स्फोटक माहिती पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरपणे घेतले असून, या चौघांना अटक करून गिट्टीखदान पोलिसांच्या हवाली केले आहे. एक दोन दिवसात या प्रकरणात महत्त्वपूर्ण तेवढीच स्फोटक माहिती उघड होण्याची शक्यता संबंधित सूत्रांनी वर्तविली आहे.
एबीटी भारताच्या उण्यावर
एबीटी ही दहशतवादी संघटना भारताच्या उण्यावर असून ती नेहमी भारतात दहशतवादी घुसवत असल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतात बनावट चलन पाठविणे, घातपात घडविण्याचे कट रचणे यातही एबीटीचा सहभाग असल्याचे अनेकदा उघड झाल्याचेही सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, ही माहिती उघड झाल्याने तपास यंत्रणांनीही आता समांतर मात्र स्वतंत्र चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.