संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य अतिथी
By योगेश पांडे | Updated: August 22, 2025 14:14 IST2025-08-22T14:13:43+5:302025-08-22T14:14:30+5:30
Nagpur : संघाच्या सार्वजनिक कार्यक्रमात येणारे ते दुसरे माजी राष्ट्रपती ठरणार

Former President Ram Nath Kovind is the chief guest at the Vijayadashami celebrations of the centenary year of the RSS.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघाच्या शताब्दी वर्षातील ऐतिहासिक विजयादशमी उत्सवाचे २ ऑक्टोबर रोजी नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या सार्वजनिक कार्यक्रमात येणारे ते दुसरे माजी राष्ट्रपती ठरणार आहेत. याअगोदर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपप्रसंगी २०१८ साली नागपुरात संघस्थानी पोहोचले होते.
१९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमीच्या दिवशीच सुरुवात झाली होती. यंदा संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे देशभरात संघाकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदाच्या विजयादशमी उत्सवाला मुख्य अतिथी कोण राहणार याबाबत स्वयंसेवकांसोबतच राजकीय व सामाजिक वर्तुळातदेखील उत्सुकता होती. संघाने दीड महिना अगोदरच याची घोषणा केली आहे. २ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी असतील. याशिवाय संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे स्वयंसेवकांना उद्बोधन करतील. या कार्यक्रमाअगोदर स्वयंसेवकांचे पहाटे शहरात पथसंचलन होईल, अशी माहिती संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी दिली आहे.
२०१८ साली पोहोचले होते मुखर्जी
२०१८ साली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित झाले होते. त्यांच्या येण्याने विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या व कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकादेखील केली होती. याच वर्षी कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम हेदेखील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी पोहोचले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षप्रतिपदेला नागपूर दौऱ्यादरम्यान संघ स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली होती.