माजी मंत्री वडेट्टीवारांच्या सौभाग्यवतींना गंडा

By Admin | Updated: August 12, 2016 02:48 IST2016-08-12T02:48:20+5:302016-08-12T02:48:20+5:30

माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या घरी सोनामाता आल्याची बतावणी करून दोघांनी वडेट्टीवार ...

Former minister Vedetiwar's family members | माजी मंत्री वडेट्टीवारांच्या सौभाग्यवतींना गंडा

माजी मंत्री वडेट्टीवारांच्या सौभाग्यवतींना गंडा

सोनामातेचे नाव : ६१ हजार रुपये उकळले
नागपूर : माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या घरी सोनामाता आल्याची बतावणी करून दोघांनी वडेट्टीवार यांच्या सौभाग्यवतींना ६१,२०० रुपयांचा गंडा घातला. बुधवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली. तब्बल १२ तासानंतर त्याची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

चर्चेचे मोहोळ उडवून देणारी ही घटना बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत घडली. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार वडेट्टीवार रामदासपेठेतील एका तारांकित हॉटेलच्या मागे राहतात. त्यांच्या ‘कमलाई ’ या निवासस्थानी बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ५० वर्षे वयोगटातील एक महिला आणि एक पुरुष आला. पुरुषाने ही महिला म्हणजे साक्षात सोनामाता आहे, असे सांगून बंगल्यात प्रवेश मिळवला. वडेट्टीवार सोनामातेचे नि:सीम भक्त आहे. त्यामुळे किरण विजय वडेट्टीवार (वय ४३) यांनी त्यांचा आदरसत्कार केला. महिलेने घरगुती स्वरूपाचे चमत्कार दाखवले. त्यामुळे किरण वडेट्टीवार यांचा विश्वास जास्तच वाढला.
महिलेने ‘साहेब’ बाहेरगावी गेले. त्यांच्याकडे लवकरच मोठी जबाबदारी येणार असून, सर्वत्र नाव होईल, अशी बतावणी केली तर, सोबतच्या व्यक्तीने साहेबांनी (वडेट्टीवार) ५१ हजारांची दक्षिणा ठेवण्यास सांगितले होते, अशी बतावणी केली. वडेट्टीवार यांनी सांगितल्यामुळे खातरजमा करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, वडेट्टीवार गडचिरोलीच्या दौऱ्यावर असल्याने संपर्क झाला नाही.
इकडे महिलेचे चमत्कार बघून किरण वडेट्टीवार आणि त्यांच्या मुलीची श्रद्धा अढळ झाली. त्यांनी त्या महिलेसमोर ५१ हजार रुपये ठेवले. सोबतच्या पुरुषाने मुलांच्या नावाने काही दान करा, असे म्हटले. त्यामुळे मुलीने स्वत:चे ५६०० आणि पुन्हा दुसरे ५६०० असे एकूण ११,२०० रुपये ठेवले. अशा प्रकारे एकूण ६१,२०० रुपये घेऊन कथित माता आणि तिच्यासोबतची व्यक्ती निघून गेली.

फोन आला, खुलासा झाला
काही वेळेनंतर विजय वडेट्टीवार यांच्याशी घरच्यांचा फोनवरून संपर्क झाला. ‘सोनामाता घरी आल्या होत्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना ६१,२०० रुपये दिल्याचे सांगितले. वडेट्टीवार यांनी आपण असे काही सांगितलेच नाही, म्हटल्यामुळे किरण यांना फसगत झाल्याचे ध्यानात आले. या घटनेची तक्रार करावी की नको, अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या किरण वडेट्टीवार यांनी रात्री १० च्या सुमारास सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली.
ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून लगेच चौकशी करून घेतली. त्यानंतर रात्री उशिरा फसवणुकीच्या आरोपाखाली ‘त्या’ दोघांविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक कांडेकर यांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, प्रकरण माजी मंत्र्यांशी संबंधित असल्याने याबाबत दिवसभर गोपनीयता बाळगण्यात आली होती, हे विशेष !

 

Web Title: Former minister Vedetiwar's family members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.