राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे यांचे देहावसान
By योगेश पांडे | Updated: July 31, 2025 17:19 IST2025-07-31T14:53:48+5:302025-07-31T17:19:24+5:30
शुक्रवारी होणार देहदान : सरसंघचालक, शांताक्का यांनी घेतले अंत्यदर्शन

Former Chief Director of Rashtrasevika Samiti Pramiltai Medhe passes away
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे (९७) यांचे बुधवारी सकाळी देहावसान झाले. त्यांच्या निधनामुळे संघ परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या इच्छेनुसार शुक्रवारी सकाळी एम्स येथे त्यांचे देहदान करण्यात येईल.
त्या राष्ट्रसेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका होत्या व त्यांच्या प्रयत्नांतून संघटनेचा देशभरात विस्तार झाला होता. १९२९ मध्ये नंदुरबारमध्ये जन्मलेल्या प्रमिलताई यांनी डीएजीपीटी येथून सिनिअर ऑडिटर पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यंनी पूर्णवेळ समितीच्या कार्याला वाहून घेतले होते. १९७५ ते २००३ या कालावधीत त्या समितीच्या प्रमुख कार्यवाहिका होत्या. तर २००३ ते २००८ या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी प्रमुख संचालिका म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रसेविका समितीच्या कार्याचा देशविदेशात विस्तार झाला. विशेषत: ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक सेवाकार्य व उपक्रम सुरू करण्यात आले. २००८ सालानंतरदेखील त्या सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय होत्या. देशविदेशातून येणाऱ्या तरुण, तरुणी, महिला व सेविकांना त्या सातत्याने मार्गदर्शन करायच्या. समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्यदेखील होत्या. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना अमेरिकेतील न्यू जर्सी येथे मानद नागरिकत्वदेखील प्रदान करण्यात आले होते. तर २०२० साली एसएनडीटी विद्यापीठातर्फे त्यांना मानद डीलिट ही पदवीदेखील प्रदान करण्यात आली होती. ९ ऑगस्ट २००३ ते २ मे २००४ या कालावधीत त्यांनी २६६ दिवसांची अखिल भारतीय पदयात्रा काढली होती व त्याची देशभरात चर्चा झाली होती. प्रमिलताई या लेखिकादेखील होत्या.
मुख्यमंत्री-गडकरींकडून श्रद्धांजली
प्रमिलताई मेढे यांच्या देहावसानाची माहिती कळताच संघ परिवारात शोककळा पसरली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना सोशल माध्यमांतून श्रद्धांजली अर्पण केली. सर्व स्वयंसेवक व सेविकांवर स्नेह करणारे मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरविले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सतर्क रहा, चुकू नका
१८ जुलैपासून नागपुरात समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी व प्रतनिधींच्या अर्धवार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समारोपाच्या दिवशी प्रमिलताई यांनी ऑनलाईन माध्यमांतून सर्वांना छोटेखानी मार्गदर्शन केले होते. सतर्क रहा, चुकू नका, चांगले काम करा असा सल्ला त्यांनी त्यावेळी दिला होता. त्यांचे तेच अखेरचे सार्वजनिक मंचावरील शब्द ठरले.