कोरोना प्रोटोकॉल पाळण्याची शहरांमध्ये सक्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:40+5:302021-06-09T04:10:40+5:30
कळमेश्वर/सावनेर/मोहपा/खापा : पावसाळ्याच्या सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढणार नाही. १०० टक्के लसीकरण होईल यासाठी आठ ...

कोरोना प्रोटोकॉल पाळण्याची शहरांमध्ये सक्ती करा
कळमेश्वर/सावनेर/मोहपा/खापा : पावसाळ्याच्या सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढणार नाही. १०० टक्के लसीकरण होईल यासाठी आठ नगरपरिषदांचा आढावा मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी घेतला.
बुटीबोरी, हिंगणा, वानाडोंगरी, वाडी, सावनेर, खापा, मोहपा, कळमेश्वर आदी नगरपरिषदांना ठाकरे यांनी भेट दिल्या. या भेटीदरम्यान मान्सूनपूर्व तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नगरपालिकेच्या नियोजनाचीही माहिती त्यांनी घेतली. सर्व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित विभागप्रमुख या बैठकीला उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण आवश्यक आहे. त्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आले आहेत. आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने लग्न व कार्यक्रमानिमित्त छोट्या शहरांमध्ये येतात. त्यामुळे बाजारपेठ, मंगल कार्यालय, रिसॉर्ट, हॉटेल्स या ठिकाणी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी शासकीय नियमांची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
नगरपालिका क्षेत्रातील दवाखाने, तालुक्याच्या ठिकाणी व मोठ्या शहरात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर तसेच सर्व सरकारी वैद्यकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व म्युकरमायकोसिससारख्या आजारासाठी सज्ज असल्याबाबतचा आढावा नियमित घेण्याच्या सूचनाही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.