निडोज बारवर धाड
By Admin | Updated: June 20, 2014 01:09 IST2014-06-20T01:09:48+5:302014-06-20T01:09:48+5:30
डान्स बार सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी मुंजे चौकातील निडोज बार अॅन्ड रेस्टॉरेंटवर बुधवारी मध्यरात्री धाड घातली. पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात सुमारे ५० ते ६० पोलिसांचा ताफा बार आणि

निडोज बारवर धाड
डिजिटल रेकॉर्डर जप्त : पोलिसांनी मध्यरात्री तपासला कानाकोपरा
नागपूर : डान्स बार सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी मुंजे चौकातील निडोज बार अॅन्ड रेस्टॉरेंटवर बुधवारी मध्यरात्री धाड घातली. पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात सुमारे ५० ते ६० पोलिसांचा ताफा बार आणि रेस्टॉरेंटवर धडकला. त्यांनी येथील कानाकोपरा तपासला. डान्स बार सुरू न आढळल्यामुळे पोलिसांनी येथील डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (डीव्हीआर) जप्त केले. मध्यरात्री १.१० पासून सुरू झालेली तपासणी कारवाई तब्बल साडेचार तास सुरू होती. या कारवाईमुळे आॅर्केस्ट्रा बार संचालकांमध्ये खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
निडोज बारमध्ये डान्स सुरू असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार यांना मिळाली. बुधवारी रात्री ते नाईट राऊंड आॅफिसर होते. त्यामुळे त्यांनी कोम्बिंग आॅपरेशन अंतर्गत गोळा केलेला सुमारे ५० ते ६० कर्मचाऱ्यांचा ताफा निडोज बारकडे बोलवून घेतला. स्वत: अभिनाशकुमार यांनी पोलीस ताफ्यासह मध्यरात्री १.१० वाजता निडोज बारवर धाड घातली. हा बार राजू जयस्वाल यांच्या मालकीचा आहे. प्रारंभी आॅर्केस्ट्रा हॉल आणि नंतर बारमधील सर्व रूमची झाडाझडती घेण्यात आली. मात्र, पोलिसांना डान्स बार आढळला नाही. एका रुममध्ये आॅर्केस्ट्रातील चार तरुणी तसेच बारमध्ये तीन ग्राहक आढळले. तरुणींनी आपण मुंबईतील असून आॅर्केस्ट्रात गायक म्हणून काम करीत असल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समजते.
आॅर्केस्ट्राच्या परवान्याचे नूतनीकरण नाही
कारवाईदरम्यान पोलिसांनी बार, आॅर्केस्ट्रा तसेच अन्य परवान्यांची कागदपत्रे तपासली. यावेळी आॅर्केस्ट्राच्या परवान्याचे नूतनीकरण नसल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी बार संचालकांकडे त्याबाबत विचारणा केली. त्यांनी परवाना नूतनीकरणासाठी दिल्याचे सांगितले. बारची तपासणी व तेथील तरुणी, ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांची चौकशी आणि बयान अशी सुमारे ४.३० वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. त्यानंतर अंबाझरीचे पीएसआय सानप यांनी चलान कारवाई केली.