नियम पाळा अन्यथा लॉन, मंगल कार्यालय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST2021-02-14T04:08:40+5:302021-02-14T04:08:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, महापालिका प्रशासन कठोर भूमिका घेण्याच्या ...

नियम पाळा अन्यथा लॉन, मंगल कार्यालय सील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, महापालिका प्रशासन कठोर भूमिका घेण्याच्या विचारात आहे. वसंत पंचमीला १६ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात विवाह समारंभ आयोजित करण्यात आले आहेत, यावर मनपा प्रशासन नजर ठेवणार आहे. क्षमतेहून अधिक लोकांची गर्दी मंगल कार्यालये, लाॅनमध्ये आढळून आल्यास सील ठोकले जाणार आहे. या संदर्भात आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी झोनचे सहायक आयुक्तांना कारवाई अधिकार दिले आहे, तसेच अपार्टमेंटमध्ये एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्यास, अपार्टमेंटमधील सर्व लोकांना कोरोना तपासणी करावी लागले. नियम न पाळल्यास संपूर्ण अपार्टमेंट सील करण्याची केले जाईल.
शनिवारी शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढती संख्या विचारात घेता, महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आढावा बैठक घेतली बैठकीत कोविडचे नवीन हॉटस्पॉट खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्यानगर, न्यू बिडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगर आदी भागातील स्थितीचा आढावा घेण्यात आला.
उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, उपनेत्या वर्षा ठाकरे, सुनील अग्रवाल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, डॉ.नरेंद्र बहिरवार, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे, मनपाचे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, नोडल अधिकारी डॉ.टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.
...
सर्व वर्गातील कर्मचाऱ्यांना चाचणी अनिवार्य : महापौर
कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेता, मनपाला कठोर भूमिका घ्यावी लागेल. शहरातील भाजी विक्रेते, डिलीव्हरी बॉय, कुरिअर सेवेतील कर्मचारी, दूध विक्रेते, हॉकर्स अशा दिवसभर अनेकांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाचणी अनिवार्य करण्यात यावी. गरज असेल, तिथे मनपाचे फिरते चाचणी केंद्र उपलब्ध करून कोरोना आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
....
असे आहेत आयुक्तांचे निर्देश
-हॉटस्पॉट ठरलेल्या भागातील किराणा दुकान, सलून, लाँड्री, अन्नधान्याचे दुकान आदींमधील कर्मचाऱ्यांची चाचणी करा.
-खासगी व शासकीय रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबातील, संपर्कातील व्यक्तींची चाचणी करा.
- कोविड रुग्ण आढळून आल्यास प्रभागातील नगरसेवकांना माहिती द्या, त्या भागात रॅपिड रिस्पॉन्स टीमद्वारे बाधिताचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून संपर्कातील २० लोकांची चाचणी करा.
-शहरातील खासगी पॅथॉलॉजी लॅबमधून चाचणी झालेल्यांची माहिती घेऊन पॉझिटिव्ह असलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे व धोकादायक वर्गातील रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात यावे.
-शाळा, वसतिगृहांमधून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होऊ शकतो त्यामुळे शाळांना मनपाच्या टीमने भेट देउन तेथे दिशानिर्देशांचे पालन होते अथवा नाही, याची पाहणी करा. वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांची चाचणी करा.
-हॉटस्पॉट ठरलेले भाग, गर्दीची ठिकाणे, कोविड संक्रमणाची शक्यता असलेल्या भागावर मनपा पथकांनी विशेष नजर ठेवावी.