कोरोना त्रिसूत्रीचे पालन करा, स्वत:ची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:37+5:302021-04-10T04:08:37+5:30
नागपूर : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत अधिक वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गंभीर होणे ...

कोरोना त्रिसूत्रीचे पालन करा, स्वत:ची काळजी घ्या
नागपूर : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत अधिक वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गंभीर होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने मास्क, सॉनिटायझर आणि फिजिकल डिस्टंसिंग या कोरोना त्रिसूत्रीचे पालन करा आणि स्वत:ची काळजी घ्या, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. उदय नार्लावार आणि जनरल फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ डॉ. नितीन गुप्ता यांनी केले आहे.
नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ‘वर्तमान परिस्थितीत कोरोनावर प्रतिबंध आणि नियंत्रण’ या विषयावर आयोजित ‘कोविड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. नार्लावार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयावह आहे. यात बाधितांचा मृत्यूदरही जास्त आहे. अशा वेळेस नागरिकांनी बेजबाबदारीने न वागता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मध्यंतरीच्या काळात नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे फेब्रुवारीपासून रुग्णसंख्येत वाढ झाली. लग्नसमारंभ, विविध सामाजिक कार्यक्रम, ग्रामपंचायत निवडणूक यातील गर्दी कोरोनाला कारणीभूत ठरली, असेही ते म्हणाले. दिवसेंदिवस कोरोना व्हायरस आपले स्वरूप बदलत आहे. ९० टक्के बाधितांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. परंतु संसर्ग वाढत जाऊन जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. नितीन गुप्ता यांनी, काही सौम्य अथवा गंभीर लक्षणे असल्यास सी.टी. स्कॅन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यातून कोरोनाचा शरिरात किती संसर्ग झाला आहे हे स्पष्ट होते. तसेच वेळोवेळी ऑक्सिजन लेवल तपासणेही गरजेचे आहे. जर बाधितांचा ऑक्सिजन ९४ पेक्षा कमी असेल, तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णालयात स्वत:ला दाखल करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच गृह विलगीकरणात असलेल्या बाधितांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. कुटुंबातील इतर सदस्यांना बाधा होणार नाही अशी घरी व्यवस्था असेल, तरच स्वत:ला गृह विलगीकरणात ठेवावे, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.