अटी पाळा व सणांचा आनंद घ्या
By Admin | Updated: September 1, 2014 01:09 IST2014-09-01T01:09:35+5:302014-09-01T01:09:35+5:30
सार्वजनिक कार्यक्रमात आयोजकांकडून दुर्लक्ष झाल्यास मोठ्या प्रमाणात अन्न विषबाधासारख्या अप्रिय घटना घडू शकतात. गणेशोत्सव आणि धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना अन्न सुरक्षा

अटी पाळा व सणांचा आनंद घ्या
अन्न प्रशासन विभागाची माहिती : नोंदणी बंधनकारक
नागपूर : सार्वजनिक कार्यक्रमात आयोजकांकडून दुर्लक्ष झाल्यास मोठ्या प्रमाणात अन्न विषबाधासारख्या अप्रिय घटना घडू शकतात. गणेशोत्सव आणि धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींनुसार नोंदणी करणे बंधनकारक असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सणासुदीच्या दिवसांत खवा, मिठाई, दूध यापासून तयार होणारे अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जातात. जनतेच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव, पूजा संपन्न करणारी मंडळे अथवा तत्सम प्रकारची मंडळे यांच्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.(प्रतिनिधी)
प्रसाद तयार करताना जागा स्वच्छ व आयोग्यदायी असावी.
प्रसादासाठी लागणारा कच्चा माल हा अन्न पदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा.
प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी आणि झाकण असलेली असावी.
फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या, परवाना अथवा नोंदणीधारकांकडून करावी. कच्चे, सडलेल्या किंवा खराब फळांचा वापर करू नये.
प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील, याची खात्री करावी.
आवश्यक तेवढाच प्रसाद तयार करावा.
प्रसाद तयार करणाऱ्या स्वयंसेवकास अॅप्रन, टोपी पुरविण्यात यावे. प्रत्येक वेळी स्वयंसेवकाने हात स्वच्छ धुवावे.
प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही त्वचा रोग संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.
प्रसादामध्ये खवा, मावा यासारखे नाशवंत अन्न पदार्थांचा वापर होत असल्यास अतिदक्षता- विशेष काळजी घ्यावी.
दूध आणि दुधजन्य पदार्थ थंड राहतील अर्थात ४ डिग्री अथवा त्यापेक्षा कमी तापमानावर साठवणुकीस ठेवावे.
खवा व माव्याची वाहतूक व साठवणूक थंड अथवा रेफ्रिजरेटेड वाहनातूनच करावी.
जुना, शिळा अथवा अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये साठविलेला मावा प्रसादासाठी वापरू नये.
प्रसाद बनविणाऱ्या मंडळींनी प्रसादाच्या कच्च्या मालाचे बिल, प्रसाद बनविणारे कॅटरर्स अथवा स्वयंसेवक तसेच वितरण करणाऱ्या स्वयंसेवकाचे नाव, संपूर्ण पत्ता इत्यादींची माहिती ठेवावी.
तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यांना संपूर्ण सहकार्य करावे व त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.