२०२१ मध्ये आरोग्याकडे ठेवा लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:49+5:302021-01-03T04:11:49+5:30

-नव्या वर्षात प्राथमिकता कशाला? कोविड-१९ विषाणुमूळे २०२० हे वर्षे अनेकांसाठी त्रासदायक गेले. आता सर्वांना लसीकरणाचे वेध लागले आहे. ...

Focus on health in 2021 | २०२१ मध्ये आरोग्याकडे ठेवा लक्ष

२०२१ मध्ये आरोग्याकडे ठेवा लक्ष

-नव्या वर्षात प्राथमिकता कशाला?

कोविड-१९ विषाणुमूळे २०२० हे वर्षे अनेकांसाठी त्रासदायक गेले. आता सर्वांना लसीकरणाचे वेध लागले आहे. परंतु सर्वांपर्यंत लस पोहचतपर्यंत कमीत कमी दोन वर्ष लागणार आहे. ५० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यास ‘हर्ड इम्युनिटी’चा फायदा इतरांना होणार आहे. यामुळे लसीकरणाच्या पहिल्या यादीत आपण नसला तरी चिंतेचे कारण नाही. लसीकरणाच्या गैरसमजूतीला दूर ठेवायला हवे. आपल्यापर्यंत लस पोहचतपर्यंत फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व हातांच्या नियमित सफाईला प्राथमिकता देणे गरजेचे आहे.

-वर्षातून एकदा तपासणी?

प्रत्येक २५ वर्षांवरील स्त्री-पुरुषाने दरवर्षाला आपल्या डॉक्टरांकडून आरोग्यप्रति समस्या, अनुवांशिकता आणि मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. लक्षणांच्या आधारावर नियमित उच्च रक्तदाब, मधुमेह, अ‍ॅनिमिया, लिपीड प्रोफाईलची तपासणी करायला हवी. चाचण्याचा अहवाल सामान्य असला तरी भविष्यातील तपासणीचा आधार तयार करण्यास त्याची मदत होते. ३५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी ईसीजी, स्ट्रेस ईसीजी आणि इकोकार्डियोग्राफीकरून आपले कार्डिओवेस्कुलर आजाराचे मूल्यांकन करायला हवे.

-कर्करोगाची तपासणी?

जर कुटुंबात कुणाला कर्करोग झाला असेल तर इतरांनी कोलोन, स्तनाचा कर्करोग आदींची तपासणी करणे गरजेचे आहे. आपल्या डॉक्टरांना याची माहिती देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास उपचारातील यश अधिक वाढते. महिलांनी मेमोग्राम आणि पेप्स स्मिअर चाचणी डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला हवी.

-हृदय विकाराचा झटक्याचा धोका कसा टाळावा?

रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवल्यास हृदय विकाराचा झटक्याचा धोका टाळता येतो. यासाठी या आजाराच्या रुग्णांनी नियमित औषध घ्यायला हवे. जर आपण ब्लड थिनर्स औषध घेत असाल तर विना डॉक्टरांच्या सल्ल्याने ते बंद करू नये. आपला मेंदू आणि शरीराकडे लक्ष ठेवायला हवे. वजनावर नियंत्रण ठेवायला हवे. आपण पूर्णत: सुदृढ असाल तरी साखर आणि मीठाचे सेवन कमीतकमी करावे. नियमित चालणे, संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. वय ४० पेक्षा जास्त असलेल्यांनी वर्षाला हृदय रोगाची तपासणी करायला हवी.

-मानसिक आरोग्याकडे कसे लक्ष द्यावे?

नैराश्य, अनिद्रा, अस्वस्थता आदी ‘सोमेटिफॉर्म’ आजार गतीने वाढत आहे. यामुळे कुटुंबासोबत नियमित व योग्य संवाद साधणे आवश्यक आहे. या शिवाय, योग्य लोकांसोबत संबंध, मदत करणाऱ्या लोकांना धन्यवाद आणि नेहमीच आनंदी रहायला हवे. भविष्याला घेऊन नेहमीच आशावादी रहायला हवे. टीव्ही व मोबाईलवरील वेळ कमी केल्यास तो वेळ चांगल्या कामात गुंतवायला हवा. याचा फायदा होताना दिसून येतो. गरीब आणि गरजूंना मदत करायला हवी. हे आपल्याला आनंद देतील. दररोज नियमित ३० मिनीटे चालल्यास, योगा व ध्यान केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. जर आपण मनोचिकित्सकाची मदत घेत असाल तर वाईट वाटून घेऊ नये. नियमित औषधोपचाराने त्यावर नियंत्रण मिळविणे व त्यातून बाहेर पडणे सहज शक्य आहे.

-रोजची दिनचर्या कशी असायला हवी?

सात तासांची झोप व एक तास व्यायाम (योग व ध्यानसिहत) आवश्यक आहे. रोजच्या दिनचर्येत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. कामाच्या ठिकाणी सर्वासोबत आपुलकीने जबाबदारीने वागायला हवे. कामकाजाच्या ठिकाणी तणावाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. अनुशासित जीवनामुळे तुम्हाला तुमचे लक्ष्य गाठता येते. कार्यालयातील तणावाला घरी आणू नये.

-टाळाटाळ करण्याच्या वृत्तीचा आरोग्याशी संबंध?

रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचे आजार आणि मानसिक आजारावरील औषध घेण्यास टाळाटाळ करू नये. स्वत:हून औषध घेऊ नये. पेनकिलर्स, अँटिबायोटिक्स आणि झोपेच्या औषधांचे साईड इफेक्ट्स असतात. वजन, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, हिमोग्लोबीन, मासिक पाळीतील अचानक बदल आणि तापाकडे दुर्लक्ष करू नये.

आपल्या फॅमिली डॉक्टरांशी नेहमीच संपर्कात रहायला हवे. आरोग्याच्या समस्येविषयी जागरुक असायला हवे. वित्तीय नियोजनासोबतच हेल्थ इन्शुरन्सला सहभागी करून घ्यावे. आरोग्यासंबंधीचे सर्व रेकॉर्डस नीट ठेवायला हवे. आपल्या डॉक्टरना वेळोवेळी वैद्यकीय इतिहासाची माहिती द्यायला हवी. २०२१ मध्ये आपण निरोगी रहावे, हीच शुभेच्छा.

Web Title: Focus on health in 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.