फ्लाय अॅश सोडली जातेय कन्हान नदीत
By Admin | Updated: December 10, 2014 00:44 IST2014-12-10T00:44:41+5:302014-12-10T00:44:41+5:30
महाराष्ट्रातील पहिले वीजकेंद्र आणि वीज निर्मितीत उच्चांक असा खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा नावलौलिक आहे. या केंद्रात विजेचे उत्पादन केले जाते की प्रदूषणाने, असा प्रश्न सध्या भेडसावत आहे.

फ्लाय अॅश सोडली जातेय कन्हान नदीत
खापरखेडा वीज केंद्राचा प्रताप : नदीतील पाणी प्रदूषित, जलजीवांना धोका
अरुण महाजन - खापरखेडा
महाराष्ट्रातील पहिले वीजकेंद्र आणि वीज निर्मितीत उच्चांक असा खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा नावलौलिक आहे. या केंद्रात विजेचे उत्पादन केले जाते की प्रदूषणाने, असा प्रश्न सध्या भेडसावत आहे. कारण, या वीज केंद्रातील ‘फ्लाय अॅश’ चक्क कन्हान नदीत सोडली जात असल्याने नदीतील पाणी प्रदूषित व्हायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे या राखेच्या वाहतुकीमुळे वायू प्रदूषणही होत आहे. यासंदर्भात पंचायत समिती सदस्य हिरा पंडागडे व सरपंच सविता भड, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
खापरखेडा येथील २१० बाय ४ मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पातील राख साठवून ठेवल्या जाते. ही राख नाल्यात सोडली जात असून, हा नाला थेट कन्हान नदीला मिळत असल्याने राखमिश्रीत पाणी कन्हान नदीत जात आहे. त्यामुळे कन्हान नदीतील पाणी दूषित झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या नदीतील पाण्याचा वापर ओलितासाठी केला जात असल्याने ‘त्या’ शेतांचा पोत खराब होऊन जमीन निकामी होण्याची शक्यता बळावली असल्याचे जाणकारांनी सांगितले.
कन्हान नदी ही या परिसरातील गावांची जीवनदात्री आहे. या परिसरातील प्रत्येक गावांमध्ये या नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेतीच्या ओलितासाठी केला जातो. वीज केंद्रातील राखेमुळे या नदीतील पाणी प्रदूषित व्हायला सुरुवात झाल्याचे लक्षात येताच हिरा पंडागडे व सविता भड यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून यात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
तक्रार प्राप्त होताच खापरखेडा पोलिसांनी नाला व नदीची पाहणी केली. पोलिसांनी कन्हान नदी व नाल्यातील पाण्याचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. वीज केंद्रातील राखेची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी वीज केंद्रात स्वतंत्र विभाग तयार केला आहे.
पोलिसांनी या विभागाचे अधिकारी विजयकुमार उपरे यांच्या विरोधात १३३ अन्वये कारवाई करून प्रकरण उपविभागीय अधिकारी (महसूल) विनोद हरकंडे यांच्याकडे सोपविले. यापूर्वीही नदीच्या पाण्यात राख सोडण्याचा प्रकार उघड झाला होता. त्यावेळी प्रकल्पाचे मुख्य अभियंता डोंगरे यांची तडकाफडकी बदली करून ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी ५०० मेगावॅट क्षमतेच्या वीज केंद्रातील काळे आॅईल कन्हान नदीत सोडल्याचा प्रकार उघड झाला. वीज केंद्र प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.