एअर गन आणि चायनीज चाकूसह भंडाऱ्याचे पाच तरुण जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 23:18 IST2021-06-01T23:17:49+5:302021-06-01T23:18:14+5:30
Five young men arrested : होंडा सिटी कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या ५ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एअर गन आणि चायनीज चाकू आढळला. त्यामुळे या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

एअर गन आणि चायनीज चाकूसह भंडाऱ्याचे पाच तरुण जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होंडा सिटी कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या ५ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एअर गन आणि चायनीज चाकू आढळला. त्यामुळे या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
राहिल शेख रशीद शेख (वय २३), सैफ सादिक शेख (वय २३), शिरफान रफिक शेख (वय २४), असद नवाब खान (वय २३) आणि शाहरुख सलमान खान (वय २२), अशी तरुणांची नावे आहेत.
हे सर्व जण भंडारा शहरातील रहिवासी आहेत. शहर वाहतूक पोलिसांचे पथक मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास कल्पना टॉकीज चौक परिसरात कर्तव्यावर असताना त्यांना पांढरी होंडा सिटी (क्र. एमएच ३६ / झेड - ८०००) कार दिसली. कारच्या काचांना काळी फिल्म लावलेली असल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी कारची पाहणी केली. आतमध्ये पाच तरुण संशयास्पद अवस्थेत दिसले. त्यांच्याकडे एअर गन आणि एक मोठा चाकू दिसल्याने एएसआय राजकुमार देशमुख, तसेच पोलीस शिपाई संदीप यांनी मानकापूर पोलिसांना कळविले. ठाणेदार वैजयंती मांडवगडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची प्रदीर्घ चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध शस्त्र प्रतिबंधक कायदा, तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपरोक्त तरुण भंडारा शहरातील धनिक परिवारातील सदस्य असून, ते मौजमजा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी भंडाऱ्यावरून निघाल्याचे समजते. ते पचमढीकडे गेले होते. तिकडून सोमवारी रात्री परत आले. सकाळी मानकापूर भागात संशयास्पद अवस्थेत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी पिस्तूल, तसेच भला मोठा चाकू कशासाठी आणला होता, ते पोलिसांकडून रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नाही.
संबंधितांकडून आटापिटा!
पोलिसांच्या ताब्यातील धनिक बाळांवर कारवाई होऊ नये म्हणून संबंधितांनी बराच आटापिटा चालविला होता, अशी माहिती पुढे आली आहे.