कोरोनाच्या दृष्टीने पाच तालुके रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:17+5:302021-02-13T04:09:17+5:30
ग्रामीण भागात तपासण्या वाढविणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत स्थिर असलेल्या कोराेनाची संख्या मागील काही ...

कोरोनाच्या दृष्टीने पाच तालुके रडारवर
ग्रामीण भागात तपासण्या वाढविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत स्थिर असलेल्या कोराेनाची संख्या मागील काही दिवसांत पुन्हा वाढत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात कमी आहे. परंतु, ग्रामीण भागातील संख्या वाढू नये म्हणून आणि ती नियंत्रणात राहावी, यासाठी ग्रामीण भागात पुन्हा एकदा तपासण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागात रुग्णांची संख्या कमी असली, तरी काही तालुक्यांतील परिस्थिती मात्र चांगली नाही. येथील पॉझिटिव्हिटी जास्त आहे. अशा तालुक्यांवर प्रशासन विशेष लक्ष देणार आहे. यामध्ये नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, हिंगणा व उमरेड तालुक्यांचा समावेश आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर पाच टक्केपेक्षा कमी असावा. हिंगणामध्ये डिसेंबर महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट २०.७ इतका होता. जानेवारीत तो ९.११ इतका आणि फेब्रुवारीमध्येही तो तसाच कायम आहे. कामठीत डिसेंबरला ५.९ टक्के होता. तो जानेवारीत १०.०२ वर आला. कळमेश्वरमध्ये १०.११ वरून ६.५३, काटोल ६.६ करून ५.१, कुही ६.१ वरून २.९६ टक्के झाला. मौद्यात ६.७ वरून ६.५७, नागपूर (ग्रा.) ११.२ वरून १९ टक्के, उमरेड ६.४ वर कायम आहे. नरखेड ५.६ वर कायम आहे. रामटेक ४.४ वरून ५.५८, सावनेर ९.५ वरून १०.५ वर आला आहे. म्हणजेच नागपूर, सावनेर, कामठी, हिंगणा येथे पॉझिटिव्हिटी दर वाढत आहे. तर, राज्याच्या तुलनेत ग्रामीण भागाचा कोरोनाचा मृत्युदर हा २.८४ टक्के म्हणजेच अधिक आहे. यात हिंगणा, कळमेश्वर, नागपूर, नरखेड, रामटेक व उमरेडमध्ये सर्वाधिक मृत्यू आहेत. ही चिंतेची बाब असल्याचेही ते म्हणाले. परिणामी, जिल्ह्यात या तालुक्यावर विशेष लक्ष देण्यात येईल.
पत्रपरिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.
बॉक्स
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा पुन्हा कडक प्रतिबंध
कोरोना वाढू नये म्हणून सुरुवातीला शासनाने अतिशय कडक प्रतिबंध घातले. मध्यंतरी, सर्व व्यवहार सुरळीत झाले. कोरोनाही नियंत्रणात होता. परंतु, मागील काही दिवसांत कोरोनाची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे नागिरकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. स्वत:ची व परिवाराची काळजी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे, लक्षणे आढळून आल्यास तपासणी करून घ्यावी. होम क्वारंटाइन व्हावे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तर कोरोना नियंत्रणात राहील, अन्यथा प्रशासनाला पुन्हा कडक प्रतिबंध घालावे लागेल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.