सुमेध वाघमारे, नागपूर : गोंदिया मेडिकल कॉलेजचा प्रशिक्षणार्थी डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटनेला एक महिना होत नाही तोच शनिवारी नागपूर मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महात्या केली. या वर्षातील विदर्भातील मेडिकल कॉलेजमधील ही पाचवी आत्महत्या आहे. विशेष म्हणजे, राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशीकने दर सहा महिन्यांनी विद्यार्थी व निवासी डॉक्टरांच्या मानसिक व शारीरिक तपासणी करण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेजला दिल्या आहेत. परंतु त्या नंतरही आत्महत्याचे सत्र सुरूच आहे.
बहुतांश मेडिकलमध्ये वाढलेल्या रुग्णांची संख्या, वसतिगृहातील सोयींचा अभाव, वाढलेले कामाचे तास, त्यातून येणारा ताण, वेळी-अवेळी झोप, वरीष्ठांची मर्जी यामुळे निवासी डॉक्टर विविध विकारांनी ग्रासले आहेत. अशीच काहीशी स्थिती एमबीबीएस विद्यार्थ्यांची आहे. साडेचार वर्षांचा एमबीबीएस अभ्यासक्रम, घरच्यांच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यात अभ्यासाचा ताण आणि यातून येणारे नैराश्याचा विळख्यात विद्यार्थी सापडत आहे. औरंगाबाद येथील एका विद्यार्थ्याने एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या काही दिवसांतच त्याला हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. याची दखल तत्कालिन सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंधडा यांनी घेतली. त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशीकला दर सहा महिन्यातून एकदा निवासी डॉक्टरांची मानसिक व शारिरीक आरोग्य तपासणी करण्याची विनंती केली. हा प्रस्ताव वैद्यकीय विद्याशाखेच्या पदव्युत्तर अभ्यासमंडळाच्या बैठकीत चर्चेस्तव ठेवण्यात आला.
यात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या निवासी डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात यावे, व प्रत्येक सहा महिन्यात आवश्यक्तेनुसार संबंधित निवासी डॉक्टराची शारिरीक व मानसिक आरोग्य तपासणी करावी व त्यास अनुसरून समुपदेशन करण्यात यावे, असा ठराव पारित करण्यात आला. परंतु राज्यभरातील अनेक मेडिकल कॉलेजेस्नी याला गंभीरतेने घेतले नसल्याचे चित्र आहे. माानसिक तणावाचे निराकरण होत नसल्याने विद्यार्थी, इंटर्न डॉक्टर व निवासी डॉक्टर मृत्यूला कवटाळत असल्याचे वास्तव आहे.