नागपुरात लस घेऊनही पाच डॉक्टर पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 11:44 IST2021-02-19T11:43:53+5:302021-02-19T11:44:36+5:30
Nagpur News कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. या आठ दिवसाच्या कालावधीत मेयो, मेडिकल व डेंटलमधील डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी व कर्मचारी मिळून ४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

नागपुरात लस घेऊनही पाच डॉक्टर पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. या आठ दिवसाच्या कालावधीत मेयो, मेडिकल व डेंटलमधील डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी व कर्मचारी मिळून ४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोज घेतल्यानंतरही पाच डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (डेंटल) २ फेब्रुवारीपासून वर्ग सुरू झाले आहेत. यातील १५ टक्के विद्यार्थी बाहेरील राज्यातील आहेत. फिजिकल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा विशेष वापर कमी झाल्याने मेडिकलमधील एमबीबीएसचे १५, डेंटलचे ५ तर मेयोचे २ असे एकूण २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले. शिवाय, मेडिकलचा १ तर डेंटलचे ३ इन्टर्न, मेडिकलचे ८ व मेयोचे २ निवासी डॉक्टर, ४ परिचारिका व ३ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. या सर्वांना रुग्णालयातच क्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोज घेऊनही पाच निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
- सहा विद्यार्थ्यांना होम आयसोलेशन
मेडिकलच्या सहा विद्यार्थ्यांकडून संमतीपत्र घेऊन त्यांना होम आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीवर तिन्ही रुग्णालय प्रशासन नजर ठेवून आहेत. परंतु विद्यार्थी, डॉक्टर व परिचारिकांमध्ये पुन्हा संसर्ग वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.