सुमेध वाघमारे
नागपूर : भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडून इतिहास रचला असताना विदर्भातील पाच जिल्ह्यांनीही राज्यात लसीकरणात चांगली कामगिरी बजावली आहे. मुंबई व पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर भंडारा जिल्हा, सहाव्या क्रमांकावर गोंदिया जिल्हा, तर चंद्रपूर, नागपूर व वर्धा अनुक्रमे ११, १२ व १३व्या क्रमांकावर आहेत. (Five districts of Vidarbha in the first 13 in vaccination)
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिल्या लाटेचा कहर ओसरताच १७ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्याता हेल्थ वर्कर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाइन वर्कर त्यानंतर ६० वर्षे ज्येष्ठ व गंभीर आजार असलेले ४५ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. १ एप्रिलपासून चौथा टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांचा समावेश करण्यात आला. २१ जूनपासून सुरू झालेल्या पाचव्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे लसीकरणाला गती आली. विदर्भात पात्र लोकसंख्येच्या ६५ टक्केपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले.
-भंडारा जिल्ह्यात ९० टक्के लोकांनी घेतला पाहिला डोस
लसीकरणात मुंबई पहिल्या स्थानावर आहे. येथे पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९७ टक्के, तर पुण्यात ९१ टक्के आहे. त्या खालोखाल भंडारा जिल्हा आहे. येथील ९०.७४ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला. ४३.३६ लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे.
-गोंदिया जिल्ह्यात ८४ टक्के, नागपूर जिल्ह्यात ७७ टक्के लसीकरण
भंडारा जिल्ह्यानंतर गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झाले. राज्यात हा जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. येथे पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ८४.४२ टक्के आहे. या शिवाय, चंद्रपूर जिल्ह्यात ७७.८२ टक्के, नागपूर जिल्ह्यात ७७.२० टक्के, तर वर्धा जिल्ह्यात ७५.१२ टक्के लसीकरण झाले आहे. गडचिरोली जिल्हा राज्यात १९व्या क्रमांकावर आहे. येथे ६१.१८ टक्के लसीकरण झाले.
-अकोला ३२ व्या क्रमांकावर
अकोला आरोग्य विभागाची कामगिरी चिंतेचा विषय आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात खालच्या पाच जिल्ह्यांमध्ये ३२व्या क्रमांकावर हा जिल्हा आहे.
- अमरावती जिल्हा २७ व्या क्रमांकावर
अमरावती जिल्ह्यात ५२.५० टक्के लसीकरण झाल्याने हा जिल्हा राज्यात २७व्या क्रमांकावर आहे. बुलढाणा जिल्ह्यात ६१.३६ टक्के लसीकरण झाल्याने हा जिल्हा २८व्या क्रमांकावर तर यवतमाळ जिल्ह्यात ५१.२३ टक्के लसीकरण झाल्याने हा जिल्हा ३०व्या क्रमांकावर आहे.
-१०० टक्के लक्ष्य गाठणार
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांनी लसीकरणात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. हे जिल्हे राज्यात पहिल्या १३ मध्ये आहे. भविष्यात आणखी चांगली कामगिरी करीत १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर