योगेश पांडे
नागपूर : इस्पितळात फार्मसी सुरू करण्यासाठी फार्मसिस्टकडून पाच कोटींचे डिपॉझिट करून प्रत्यक्षात आणखी एक फार्मसी सुरू करणाऱ्या डॉक्टरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एशियन किडनी हॉस्पिटल ॲंड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.समीर बालस्वरुप चौबे (शंकरनगर चौक) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. तर समीर सव्वालाखे (४७, जयंती मॅंशन, मनीषनगर) हे तक्रारदार आहेत. सव्वालाखे हे फार्मसीचा व्यवसाय करतात. २०१९ मध्ये डॉ.चौबे यांच्या इस्पितळात फार्मसी टाकण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली. डॉ.चौबे यांनी पाच कोटींची मागणी केली. इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने सव्वालाखे यांनी काही मित्रांना विचारणा केली.
डॉ.चौबे यांच्या इस्पितळातून महिन्याला ८० ते ९० लाखांचा व्यवसाय मिळेल असा अंदाज असल्याने त्यांच्या मित्रांनी गुंतवणूक करण्यास होकार दिला. सचिन माकडे यांनी १.८७ कोटी, वरुण कुमार चौहान यांनी १.८७ कोटी, समीर सव्वालाखे यांनी एक कोटी तर दीपक सिंग यांनी २५ लाख गुंतविले. २१ सप्टेंबर २०१९ रोजी डॉ.चौबे व सव्वालाखे यांच्यात सामंजस्य करार झाला. पाच कोटी डिपॉझिट असेल व त्यातील ५० टक्के रक्कम फार्मसी रिकामी करताना परत मिळेल असे ठरले होते.
सव्वालाखे व त्यांच्या मित्रांनी डॉ.चौबे यांना १४.४५ लाख उधारदेखील दिले. डॉ.चौबे हे फार्मसीला महिन्याला ८० ते ९० लाखांचा व्यवसाय देतील, इस्पितळात इतर कुठलीही फार्मसी सुरू करणार नाहीत व विक्रीतील १८ टक्के रक्कम डॉ.चौबे यांना देण्यात येईल, असे करारात नमूद होते. मात्र डॉ.चौबे यांनी कराराचे उल्लंघन करून दुसरी फार्मसी सुरू केली. त्यामुळे सव्वालाखे यांचा कमी व्यवसाय होऊ लागला व नुकसान होऊ लागले. त्यामुळे गुंतविलेली रक्कम परत करा किंवा तुमची फार्मसी बंद करा असे सव्वालाखे यांनी डॉ.चौबे यांना म्हटले.
मात्र डॉ.चौबे यांनी तुम्हाला जे करायचे आहे ते करा असे म्हटले. त्यांच्या कुटुंबियांनीदेखील प्रतिसाद दिला नाही. अखेर सव्वालाखे यांनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी डॉ.चौबे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून वैद्यकीय क्षेत्राचे व्यावसायिकीकरण किती झाले आहे हेदेखील समोर येत आहे.
Web Summary : Nagpur doctor, Dr. Choubey, faces fraud charges for allegedly taking ₹5 crore deposit for a pharmacy, then opening another, causing losses to the complainant, Savvalakhe, and investors. Police have registered a case.
Web Summary : नागपुर के डॉक्टर चौबे पर फार्मेसी के लिए 5 करोड़ रुपये जमा करने और फिर दूसरी फार्मेसी खोलने का आरोप है, जिससे शिकायतकर्ता सव्वालाखे और निवेशकों को नुकसान हुआ। पुलिस ने मामला दर्ज किया है।