नागपुरात दरोड्याच्या तयारीतील पाच सशस्त्र गुंड जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 21:14 IST2020-06-13T21:12:46+5:302020-06-13T21:14:54+5:30
दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सशस्त्र गुंडांना तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी पहाटे जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांचा एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

नागपुरात दरोड्याच्या तयारीतील पाच सशस्त्र गुंड जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सशस्त्र गुंडांना तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी पहाटे जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांचा एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
तहसील ठाण्यातील पोलीस हवालदार लक्ष्मण गजानन शिंदे आणि त्यांचे सहकारी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर डोबीनगर परिसरात गस्त करीत असताना त्यांना रेल्वे बोगद्याजवळ सशस्त्र गुन्हेगार गुन्हा करण्याच्या तयारीत जमले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना गराडा घातला. अंधाराचा फायदा घेऊन कुख्यात गुंड फुरकान खान रमजान खान पळून गेला. मात्र सागर राजेश गौर, प्रकाश ऊर्फ पक्या विठोबाजी हेडाऊ, विजेंद्र ऊर्फ सोनू दिलीप वर्मा, कैलास गणेश गौरी आणि गुंजन ऊर्फ चिंटू विश्वजित हुमणे या पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार, चाकू, पिस्तूलसारखी दिसणारी लाईटरगन, लोखंडी टॉमी आणि नायलॉनची दोरी जप्त करण्यात आली. त्यांच्याविरोधात भादंविच्या कलम ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
गुंगी आणणारा स्प्रे ही जप्त
उपरोक्त गुन्हेगार दरोड्यासारखा मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते. त्यांच्याजवळ पोलिसांना कीटकनाशकाने भरलेला स्प्रेही आढळला. हा स्प्रे कूलरमध्ये मारल्यास किंवा खिडकीतून आत मध्ये फवारल्यास घरातील मंडळीला गुंगी येते आणि ते कोणताही प्रतिकार करू शकत नाही. आरोपीच्या फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.