आंतरराष्ट्रीय टोळीतील पाच आरोपी जेरबंद

By Admin | Updated: May 30, 2014 01:11 IST2014-05-30T01:11:41+5:302014-05-30T01:11:41+5:30

पाचशे आणि हजारांच्या बनावट नोटा नागपुरात चालवू पाहाणारे सर्व आरोपी पश्‍चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहाणार्‍या आंतरराष्टीय टोळीचे ते सदस्य आहेत.

Five accused in international gang jerband | आंतरराष्ट्रीय टोळीतील पाच आरोपी जेरबंद

आंतरराष्ट्रीय टोळीतील पाच आरोपी जेरबंद

बनावट नोटा चलनात : दोन दिवसांपूर्वीच आली खेप
नागपूर : पाचशे आणि हजारांच्या बनावट नोटा नागपुरात चालवू पाहाणारे सर्व आरोपी पश्‍चिम  बंगालच्या मालदा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहाणार्‍या  आंतरराष्टीय टोळीचे ते सदस्य आहेत.
मोहम्मद शाकीर तयमूर शेख  (वय १९, रा. कगमरी - लकीपूर  जि.  मालदा), शुकुमार अभिलाष  सोरकार(वय १९, रा. दुरायगंज, कगमरी), अभिरल्ल इस्लाम सेदाबुद्यीन मोबीन (वय १९. रा.  बाम्बला,  मेहरापूर), मोहम्मद
समाद हुसेन   निमाजुद्यीन शेख (वय २0,  रा. दुदालगंज,   कगमरी) आणि मोहम्मद अजीज    मोहम्मद तानू शेख (वय १९, रा. गुलालगंज, कगमरी) अशी आरोपींची नावे आहेत.
अशी गवसली टोळी
 बुधवारी सायंकाळी बनावट नोट चालविण्याच्या प्रयत्नात  यातील एक भामटा काटोल मार्गावरील  प्युमा रेस्टॉरेंटजवळ गेला. त्याने बंडीवरून दीड किलो आंबे घेतले. बदल्यात हजाराच्या बंडलातील  एक कोरी करकरीत नोट दिली. मजुरासारखा दिसणार्‍या या भामट्याजवळ हजारांच्या नोटाचे  बंडल पाहून विक्रेत्याला संशय आला. त्याने बाजूच्या पोलिसांना सांगितले. गिट्टीखदान पोलिसांनी  त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सारख्या नंबरच्या १ हजारांच्या १३ बनावट नोटा आढळल्या.
 त्या जप्त केल्यानंतर त्याला पोलिसांनी बोलते केले. त्याने आपल्या साथीदारांची नावे आणि सध्या  ते कुठे दडून बसले, त्याची माहिती दिली.
त्यानुसार, गणेशपेठमधील क्रिष्णा टॉकीजजवळच्या रामेश्‍वरी लॉजमध्ये पोलिसांनी छापा घातला.  तेथून चार भामट्यांना पोलिसांनी ४ लाख ३0 हजारांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले. गुरुवारी  लोकमतने हे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बोंडे आणि  त्यांच्या सहकार्‍यांनी या सर्वांंची रात्रभर चौकशी केल्यानंतर त्यांनी प. बंगाल ते नागपूर प्रवासाची  माहिती दिली. (प्रतिनिधी)
‘तो‘ राजू कोण
लॉज प्रशासनाच्या रेकॉर्डनुसार, दोन दिवसांपूर्वीच ते या लॉजमध्ये राहायला आले होते. आरोपींनी  सांगितल्याप्रमाणे राजू नामक आरोपीने दोन दिवसांपूर्वी त्यांना पाच लाखांच्या नोटांची खेप आणून  दिली. हा राजू कोण, त्याचा आता पोलीस शोध घेत आहे. आज पोलिसांनी दोन दिवसांचा  पीसीआर मिळवला. पीसीआरमधून अनेक बाबींचा खुलासा होऊ शकतो, असे तपास  अधिकार्‍यांचे मत आहे.
२0 टक्के कमिशन
उपरोक्त सर्व आरोपी २0 टक्के कमिशनवर काम करतात. त्यांच्या राहाण्या-खाण्याची व्यवस्था या  टोळीचा म्होरक्या आपल्या हस्तकामार्फत करतो. त्यांना केवळ बनावट नोटा चलनात आणण्याची  जबाबदारी पार पाडावी लागते. नोटा पोहचवून देणारी वेगळी टोळी असते. या नोटा चलनात आणून  त्याच्या बदल्यात असली नोटा गोळा केल्या की त्या टोळी प्रमुखाच्या हवाली करायच्या. नंतर,  त्यांचे कमिशन त्यांच्या घरी पोहचविल्या जाते. नोटा चालविल्यानंतर त्यांनी परस्पर पळून जाऊ नये  म्हणून, त्यांच्यावर लक्ष ठेवणारी दुसरी एक टोळी असते. चुकून नोटा चालविताना हे पकडले गेले  तर यांच्यावर लक्ष ठेवणारे भामटे पळून जातात.
 

Web Title: Five accused in international gang jerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.