राज्यात पहिल्यांदा ताडोब्यात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर; व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक

By कमलेश वानखेडे | Published: January 23, 2024 05:43 PM2024-01-23T17:43:12+5:302024-01-23T17:44:59+5:30

बफरमधील गावांना कौशल्य विकास प्रशिक्षण.

First time in the state the use of electric vehicles for tourists in nagpur | राज्यात पहिल्यांदा ताडोब्यात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर; व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक

राज्यात पहिल्यांदा ताडोब्यात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर; व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक

कमलेश वानखेडे,नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक गेटवर या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. देशात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्यटनासाठी उपयोग करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण सुरु करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्ग पर्यटनासंबंधी नियमन करणे तसेच व्याघ्र प्रकल्प व सभोवतालच्या क्षेत्राच्या सोयी सुविधांच्यादृष्टिने वाढ करण्यासाठी विभागीय आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा कोअरचे उपसंचालक नंदकिशोर काळे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबळेकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापूरे, मोहर्लीच्या सरपंच श्रीमती सुनिता कातकर आदी उपस्थित होते.

ताडोबा-अंधारी या प्रकल्पामध्ये वाघाचे सर्वाधिक वास्तव्य असल्यामुळे देश व विदेशातील पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोअर तसेच बफर क्षेत्रात पर्यटकांसाठी निर्धारित क्षेत्रात सुमारे दीडशे पेक्षा जास्त वाघांचे वास्तव्य आहे. पर्यटकांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी गाईड, वाहन चालक तसेच हॉस्पीटॅलीटी उद्योगामध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या परिसरात सुमारे ८२ गावे असून त्यापैकी ६२ गांवातील कुटुंबांना विविध रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

रिसॉर्टमधील ध्वनी प्रदूषण प्रतिबंधासाठी समिती -ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या बफर क्षेत्राबाहेर हॉटेल्स, रिसॉर्ट्स संदर्भात आवश्यक परवानगी तसेच बांधकाम नियमानुसार असल्याबाबतची तपासणी करतांनाच येथे ध्वनीप्रदुषण तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत दिव्यांची प्रखर रेाषणाई संदर्भात वन, महसूल तसेच स्थानिक पदाधिकारी यांची समिती गठित करुन येत्या तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्यात.

हॉटेल व रिसॉर्टमध्ये स्थानिकांना ५० टक्के नोकऱ्या - आदरातिथ्य उद्योगामध्ये स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान ५० टक्के रोजगार बफर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने द्यावा अशा सूचना करतांना बिदरी यांनी बफर क्षेत्रात होम स्टे करिता स्थानिक कुटुंबांनाच प्राधान्य आहे. बफर क्षेत्रातील सर्व रिसॉर्ट्स , होमस्टे नियमितीकरणासाठी तपासणी करावी व नियमबाह्य असलेल्यांवर त्वरीत कार्यवाही करावी.

विदेशी पर्यटकांसाठी गाईडला इंग्रजी भाषा प्रशिक्षण - या क्षेत्रातील सर्व जीप्सीधारक हे स्थानिक असावे व मंजुर पर्यटन आराखड्यानुसार त्यांची नोंदणी करावी. गाईड यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी तसेच विदेशी पर्यटकांच्या दृष्टिने इंग्रजी व हिंदी भाषेचे प्रशिक्षण, व्याघ्र प्रकल्पात असलेले वन्यजीव, पक्षी तसेच वृक्षांबद्दलची संपूर्ण माहितीबाबत विशेष प्रशिक्षण आयोजित करावे. पर्यटकांसाठी उपलब्ध जीप्सी तसेच पर्यटक शुल्कामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने प्रस्ताव तयार अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

Web Title: First time in the state the use of electric vehicles for tourists in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.