पहिल्याच दिवशी ३१ संशयित कुष्ठरुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:40+5:302020-12-02T04:12:40+5:30
क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोधमोहिमेला सुरुवात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम ...

पहिल्याच दिवशी ३१ संशयित कुष्ठरुग्ण आढळले
क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोधमोहिमेला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम अंतर्गत नागपूर शहरात सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोधमोहिमेला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी ३१ संशयित कुष्ठरुग्ण आढळले.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. ही शोधमोहीम १ ते १६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
पहिल्या दिवशी क्षयरोग सोसायटीच्या ४३३ चमूंनी २१,८४१ लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. यात ३१ संशयित रुग्ण आढळले. त्यांची तपासणी करून पुढील उपचार केले जातील.
समाजातील क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार चालू करण्याचे आवाहन राम जोशी यांनी क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या सदस्यांना केले. रोगशास्त्रीय अभ्यासानुसार क्षय व कुष्ठ आजाराचे रुग्ण, निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. तसेच त्याच्या सहवासातील इतर लोकांनासुद्धा या आजारांचा धोका असल्याने समाजातील सर्व क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार चालू करणे हा अभियानाचा उद्देश आहे.
कार्यक्रमाला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार, डॉ. अनिरुद्ध कडू आदी उपस्थित होते.