पहीला ठोका हृदयाचा दुसरा शाळेचा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:05+5:302020-12-15T04:26:05+5:30
नागपूर : आठ महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर हो-नाही म्हणत अखेर नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी शाळेचा ठोका वाजला. शाळेच्या प्रवेशद्वारावर ...

पहीला ठोका हृदयाचा दुसरा शाळेचा...
नागपूर : आठ महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर हो-नाही म्हणत अखेर नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी शाळेचा ठोका वाजला. शाळेच्या प्रवेशद्वारावर हातात थर्मल गन, सॅनिटायझर घेऊन उभे असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पाहून विद्यार्थ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. तपासणीनंतर आपल्याला आत तर घेतले जाईल ना, असा प्रश्न काही विद्यार्थ्यांना निश्चितच पडला. थर्मल चाचणी आणि हात सॅनिटाईझ केल्यानंतर विद्यार्थ्यांना ठराविक अंतर ठेवून शाळेच्या प्रांगणात सोडण्यात आले, यानंतरच शाळेचा ठोका वाजला. राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २६ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नागपूर जिल्ह्यातील १३० हून अधिक शिक्षकांना कोरोनाची चाचणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द केला होता. यानंतर प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार सोमवारी शाळांना सुरुवात झाली. मात्र या शाळा सुरू करण्यापूर्वी पुन्हा मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीचे दिव्य पुन्हा पार पाडावे लागले. भिवापूर तालुक्यात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत शाळांना सुरुवात झाली. स्थानिक विद्यानिकेतन शाळेने एका वर्गाच्या दोन बॅचेस करीत एक टेबल एक विद्यार्थी अशी उपाययोजना केल्याचे दिसून आले. शाळेत प्रवेश करताच बुकावर विद्यार्थ्याची नोंद, तापमानाची नोंद, यानंतरच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. शिवाय एका वर्गात ५० विद्यार्थी असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दोन बॅचेस करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील इतर शाळातही अशाच प्रकारचे चित्र होते. राष्ट्रीय विद्यालय, भिवापूर, सायंटिफिक कॉन्व्हेंट या शाळासुद्धा अशाच प्रकारे नियमांचे पालन करीत सुरू झालेल्या आहेत.
शिक्षण सभापतींनी केली पाहणी
जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील यांनी सोमवारी भिवापूर तालुक्यात दाखल होत शाळांना भेटी दिल्या. शिवाय कोरोना संसर्गाच्या दृष्टीने शाळेकडून घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केली. जिल्हा परिषद हायस्कूल नांद शाळेला दिलेल्या भेटीदरम्यान शिक्षण सभापती भारती पाटील यांच्यासह समाजकल्याण सभापती नेमावली माटे, जिल्हा परिषद सदस्य शंकर डडमल उपस्थित होते.