नागपुरात फटाक्याचा साठा जप्त : बंद हॉटेलमध्ये छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:20 AM2019-10-04T00:20:45+5:302019-10-04T00:21:21+5:30

पाटणकर चौकातील एका बंद हॉटेलमध्ये छापा घालून पोलिसांनी ६० लाखांचे फटाके जप्त केले. जप्त केलेल्या फटाक्यांमध्ये तीव्र क्षमतेच्या फटाक्यांचा तसेच अतिज्वलनशील वस्तूंचा समावेश आहे.

Fireworks stocks seized in Nagpur: raids in closed hotels | नागपुरात फटाक्याचा साठा जप्त : बंद हॉटेलमध्ये छापा

नागपुरात फटाक्याचा साठा जप्त : बंद हॉटेलमध्ये छापा

Next
ठळक मुद्देआतमध्ये आढळले लाखोंचे फटाके : जरीपटका पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाटणकर चौकातील एका बंद हॉटेलमध्ये छापा घालून पोलिसांनी ६० लाखांचे फटाके जप्त केले. जप्त केलेल्या फटाक्यांमध्ये तीव्र क्षमतेच्या फटाक्यांचा तसेच अतिज्वलनशील वस्तूंचा समावेश आहे. आपण राहतो त्या ठिकाणी स्फोटकांचा प्रचंड साठा असल्याचे परिसरातील नागरिकांना पोलिसांच्या कारवाईनंतर लक्षात आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी हॉटेल मालक तसेच फटाक्याचे घबाड जमविणारा आरोपी नीलेश ऊर्फ चिंटू राजू शाहू (कपिलनगर) आणि त्याचा साथीदार राजकुमार छोटेलाल शाहू (कोराडी) या दोघांना ताब्यात घेतले.
जरीपटक्यातील पाटणकर चौकात रॉयल पॅलेस नामक हॉटेल आहे. ते तीन महिन्यापासून बंद पडले आहे. आरोपी चिंटू शाहू त्याचा संचालक आहे. त्याने या बंद हॉटेलमध्ये तीव्र क्षमतेचे फटाके मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याची माहिती जरीपटका पोलिसांना मिळाली. त्यामुळे तेथे छापा मारून आरोपींना रंगेहात पकडण्याची योजना ठाणेदार पराग पोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनविली. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास आरोपी हॉटेलच्या दाराजवळ पोहचले. आधीच सापळा लावून असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे लक्ष वेधले. आरोपी चिंटू आणि राजकुमार शाहू आतमध्ये शिरले आणि त्यांनी आतून दार बंद करून घेतले. त्याचक्षणी पोलिसांनी तेथे धडक दिली. आतमध्ये मोठ्या प्रमाणावर खरड्याचे बॉक्स ठेवून होते. त्यांची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फटाके, बॉम्बसह वेगवेगळ्या अतिज्वलनशील वस्तू आढळल्या. प्राथमिक तपासणीनंतर आरोपींना विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी फटाक्यांचे मूल्यांकन सुरू केले. रात्री १० वाजेपर्यंत फटाक्याची किंमत ५० लाखांपर्यंत पोहचली होती. एकूण फटाक्यांची किंमत ६० लाखांपर्यंत जाईल, असे ठाणेदार पराग पोटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कोणताच परवाना नाही
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपीकडे फटाके विक्रीचा, बाळगण्याचा, साठवण्याचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी जेथे ही साठवणूक केली, त्या ठिकाणाला गोदाम म्हणूनही परवाना नाही. अग्निशमन विभागाचीही त्यांच्याकडे परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. दुसरे म्हणजे, ६० लाखांवर किंमत असलेले हे फटाके ६० ते ७० हजारांचे आहे, असे दोन्ही आरोपींनी पोलिसांना प्राथमिक विचारपूस केली असता सांगितले होते.
.मोठा अनर्थ टळला
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणाला आरोपींनी हे ‘स्फोटकाचे गोदाम’ बनविले, ते ठिकाण वर्दळीचा भाग आहे. चुकून तेथे आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने वेळीच पोलिसांच्या हे लक्षात आल्याने तो टळला. पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, एपीआय बादोले, पीएसआय माधव शिंदे, हवालदार सुनील तिवारी, रवी अहिरे, गणेश गुप्ता आदींनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Fireworks stocks seized in Nagpur: raids in closed hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.