सर्जिकल कॉम्प्लेक्स, ट्रॉमा केअर सेंटरवरही अग्नितांडवाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:33+5:302021-01-13T04:20:33+5:30
नागपूर : मेयोचे सर्जिकल कॉम्प्लेक्स रुग्णसेवेत सुरू होऊन ४ वर्षांचा तर, मेडिकलचे ट्रॉमा केअर सेंटर सुरू होऊन ५ वर्षांचा ...

सर्जिकल कॉम्प्लेक्स, ट्रॉमा केअर सेंटरवरही अग्नितांडवाचे संकट
नागपूर : मेयोचे सर्जिकल कॉम्प्लेक्स रुग्णसेवेत सुरू होऊन ४ वर्षांचा तर, मेडिकलचे ट्रॉमा केअर सेंटर सुरू होऊन ५ वर्षांचा कालावधी झाला आहे. परंतु या दोन्ही इमारतींना अग्निशमनचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नाही. ६०० खाटांच्या या दोन्ही इमारतीत कोविडचे रुग्ण भरती आहेत. दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडात १० चिमुकल्यांचा करुण अंत झाला. अशीच घटना २०१८ मध्ये अंधेरीतील कामगार रुग्णालयात घडली. भीषण आगीत ६ निरपराधांना आपला जीव गमवावा लागला तर, १४७ हून अधिक जखमी झाले होते. दरवर्षी थोड्या अधिक फरकाने अशा घटना घडत असतानाही यातून धडा घेण्यास कुणीच तयार नाहीत. अग्नितांडवाचे हेच संकट नागपुरात रुग्णसेवेत असलेल्या रुग्णालयांभोवती घोंगावत आहे. अग्निसुरक्षेबाबत असलेल्या नियमांचा बडगा दाखविणाऱ्या सरकारला शासकीय रुग्णालयांचा मात्र विसर पडल्याचे यातून दिसून येते.
- ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’मध्ये आग नियंत्रणाची पूर्तताच नाही
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) सर्जिकल कॉम्प्लेक्स २०१७ मध्ये रुग्णसेवेत दाखल झाले. प्राप्त माहितीनुसार, या कॉम्प्लेक्सचे फायर ऑडिट झाले. त्यात आवश्यक आग नियंत्रण यंत्रणा बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या. यात रुग्णालयाच्या बांधकामानुसार पाण्याची टाकी, वीज नसल्यास पाणीपुरवठ्यासाठी पंप, वेळप्रसंगी बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग, अग्निशामक उपकरण, हायड्रन्ट व्यवस्था, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म, पम्प हाऊस व स्प्रिंकलर आदींची सोय करण्यास सांगण्यात आले होते. परंतु याची पूर्तताच झाली नाही. यामुळे अग्निशमनचे ना हरकत प्रमाणपत्रच मिळाले नाही. पूर्वी या कॉम्प्लेक्समध्ये जनरल सर्जरीपासून, नेत्ररोग विभाग, अस्थिरोग विभाग, ईएनटी विभागाचे वॉर्ड व शस्त्रक्रिया गृह होते. परंतु जून २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच या कॉम्प्लेक्सचे रुपांतर कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. ६०० खाटांच्या या कॉम्प्लेक्समध्ये सध्या २००वर रुग्ण उपचाराखाली आहेत.
- ट्रॉमा केअर सेंटर’ला केवळ एक दिवसाची ‘एनओसी’
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बहुप्रतिक्षेत ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन २७ मे २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. प्राप्त माहितीनुसार, या सेंटरला अग्निशमनचे ना हरकत प्रमाणपत्र उद्घाटनाच्या दिवसापुरतेच दिले होते. उद्घाटनानंतर ‘फायर ऑडिट’ करून पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते. परंतु नंतर बांधकाम विभागाने याला गंभीरतेने घेतले नाही. येथेही आवश्यक आग नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली नाही. सध्या जागोजागी अग्निशामक उपकरण बसविण्यात आले आहे. परंतु अद्यायावत सोयी नाहीत. पूर्वी या सेंटरमध्ये अपघातातील गंभीर जखमी रुग्णांवर उपचार केले जात होते. परंतु आता कोविड रुग्णांसाठी ६०० खाटांचे हे सेंटर राखीव ठेवण्यात आले आहे. सध्या १००वर रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे.