इतवारी रेल्वेस्थानकावरील गोडाऊनला आग
By Admin | Updated: June 11, 2014 01:35 IST2014-06-11T01:35:28+5:302014-06-11T01:35:28+5:30
इतवारी रेल्वेस्थानकावरील फर्निचरच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी १.५५ वाजता शॉट सर्किटमुळे आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आगीची सूचना अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे आठ

इतवारी रेल्वेस्थानकावरील गोडाऊनला आग
५० हजाराचे फर्निचर खाक : सुदैवाने जीवितहानी टळली
नागपूर : इतवारी रेल्वेस्थानकावरील फर्निचरच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी १.५५ वाजता शॉट सर्किटमुळे आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आगीची सूचना अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून गोडाऊनमधील आगीवर पाऊण तासात नियंत्रण मिळविले. परंतु तोपर्यंत गोडाऊनमधील ५० हजाराचे फर्निचर जळून खाक झाले होते.
इतवारी रेल्वेस्थानकावर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मालकीचे जुन्या फर्निचरचे गोडाऊन आहे. हे गोडाऊन रेल्वेस्थानकापासून दूर लकडगंज पोलीस ठाण्याकडील भागात आरामशीनकडे आहे. दुपारी १.५५ वाजता या गोडाऊनला आग लागली. कडक उन्हात ही आग पाहताक्षणीच आणखी भडकली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला आगीची सूचना देण्यात आली. अर्ध्या तासानंतर अग्निशमन विभागाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे अधिकारी, आरपीएफचे आणि लोहमार्ग पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
अग्निशमन विभागाच्या बंबांनी पाण्याचा मारा करून पाऊण तासानंतर ही आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत ५० हजार रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले होते. हे गोडाऊन रेल्वेस्थानकापासून दूर अंतरावर असल्यामुळे सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)