मेडिकलमध्ये लागणार अग्निशमन उपकरणे
By Admin | Updated: June 16, 2014 01:12 IST2014-06-16T01:12:08+5:302014-06-16T01:12:08+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) मागील काही वर्षांत आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. याची दखल घेत मेडिकल प्रशासन १८ ठिकाणी अग्निशमन उपकरणे लावणार आहे.

मेडिकलमध्ये लागणार अग्निशमन उपकरणे
५० हजारांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) मागील काही वर्षांत आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. याची दखल घेत मेडिकल प्रशासन १८ ठिकाणी अग्निशमन उपकरणे लावणार आहे. या सोबतच सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना ही उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षणही देणार आहे.
आगीसारखी दुर्घटना घडून रु ग्णांचे प्राण संकटात सापडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. अधिष्ठात्यांनी उपकरणे खरेदीच्या प्रस्तावाला गुरु वारी मंजुरीही दिली आहे. विजेचे उपकरण, पेट्रोलियम पदार्थ आणि रसायनांमुळे लागणाऱ्या तिन्ही स्वरूपाच्या आगी विझविण्यासाठी वापरले जाणारे ‘फायर इस्टिंग्युशर सिलिंडर’ कार्यान्वित केले जाणार आहेत. आॅपरेशन थिएटर, पेर्इंग वॉर्ड, एमआर आॅफिस आणि अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात हे उपकरण लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. स्थानिक स्तरावर ५० हजार रु पयांपर्यंतच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्याचा अधिकार अधिष्ठात्यांना असतो. त्यात मेडिकलमध्ये गेल्या आठवड्यात ई-लायब्ररीजवळ आगीची दुर्घटना घडली होती. प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने या आगीत सरकारी मालमत्तेचे नुकसान होता होता वाचले होते.
या घटनेला गंभीरतेने घेत वॉर्डांमध्ये अशी घटना घडू नये, यासाठी अधिष्ठात्यांनी या फायर फायटिंग उपकरण खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रगती कॉलनीतील मॉडर्न ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपनीला या फायर फायटिंग उपकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकल रुग्णालयातील आॅपरेशन थिएटर परिसरात सहा, पेर्इंग वॉर्डात चार, एमआर आॅफिस परिसरात सहा आणि अधीक्षकांच्या कार्यालयालया जवळच्या ईएनटी बाह्यरु ग्ण विभागात दोन असे १८ सिलिंडर बसविणार आहे. (प्रतिनिधी)