दुसर्या दिवशीही आगीची धग कायमच
By Admin | Updated: June 4, 2014 01:08 IST2014-06-04T01:08:15+5:302014-06-04T01:08:15+5:30
तालुक्यातील मांडला शिवारातील जगदंबा जिनिंग प्रेसिंगला लागलेल्या आगीची धग मंगळवारीही कायमच होती. सुदैवाने आग लागल्याची माहिती या जिनिंगमधील कर्मचारी व कामगारांना मिळताच ते सर्व

दुसर्या दिवशीही आगीची धग कायमच
जिनिंग प्रेसिंगला आग : सरकीची पोती अजूनही विझली नाही
आर्वी : तालुक्यातील मांडला शिवारातील जगदंबा जिनिंग प्रेसिंगला लागलेल्या आगीची धग मंगळवारीही कायमच होती. सुदैवाने आग लागल्याची माहिती या जिनिंगमधील कर्मचारी व कामगारांना मिळताच ते सर्व जण बाहेर पडल्याने मोठी जिवीत हानी टळली. दरम्यान, या आगीची तीव्रता पाहता नुकसानीच्या आकडेवारीत मोठी वाढ होणार असल्याची माहिती पोलिसांच्यावतीने देण्यात आली.
सोमवारी भरदुपारी लागलेल्या या आगीची तीव्रता भयंकर होती. त्यात वाहत्या हवेने या आगीच्या तिव्रतेत भर पडली. पाहता-पाहता चार मोठय़ा गोदामांपैकी दोन गोदामांमध्ये ठेवलेल्या सरकीच्या पोत्यांना आगीने आपल्या कवेत घेतले. क्षणात सरकीचे पोते जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच आर्वी न.प.च्या अग्निशमन विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता पाहता या आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी पुलगाव कॅम्प, मांडवा येथील अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. परंतु आगीने रौद्र रूप धारक केल्याने रात्री उशिरापर्यंत या लागलेल्या आगीची धग कायम होती. घटनास्थळी तळेगावचे ठाणेदार दिनेश झामरे व पोलीस ताफा परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हजर होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गृहरक्षक दलाच्या सागर थेरे, आकाश पवार, संदीप चौकडे, मोहम्मद इमान या युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. आगीच्या तिव्रतेने या गोदामातील टीन पूर्णत: वितळून गेले. तर सरकी व कापसाची राख झाली. (तालुका प्रतिनिधी)