नागपुरात मास्क न वापरल्यास २०० रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 09:33 PM2020-06-04T21:33:58+5:302020-06-04T21:35:21+5:30

घराबाहेर सार्वजनिक वा इतर कोणत्याही ठिकाणी वावरताना मास्क न लावल्यास २०० रुपये दंड केला जाईल. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीकडून तीनदा दंड वसूल करण्यात आल्यास त्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले असून आज शुक्रवारपासून हे आदेश अमलात येतील.

A fine of Rs 200 for not wearing a mask in Nagpur | नागपुरात मास्क न वापरल्यास २०० रुपये दंड

नागपुरात मास्क न वापरल्यास २०० रुपये दंड

Next
ठळक मुद्देतीनदा दंडात्मक कारवाईनंतर होणार गुन्हा नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने त्रिस्तरीय फेस मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. घराबाहेर सार्वजनिक वा इतर कोणत्याही ठिकाणी वावरताना मास्क न लावल्यास २०० रुपये दंड केला जाईल. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीकडून तीनदा दंड वसूल करण्यात आल्यास त्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले असून आज शुक्रवारपासून हे आदेश अमलात येतील.
आपण सर्व कोव्हिडशी लढा देत आहोत. कोव्हिडचा संसर्ग तोंड, नाक आणि डोळ्यातून जास्त होतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. साथरोग अधिनियम १९८७ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीअनुसार नागपूर शहर सीमेत सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयाच्या ठिकाणी, वाहतूक करताना व इतर ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य आहे. मास्क न लावल्यास संबंधित व्यक्तीकडून २०० रुपये दंड आकारण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.
मनपाच्या उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, सर्व झोनचे सहायक आयुक्त व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे मनपाचे सर्व संबंधित अधिकारी, सर्व संबंधित पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व कार्यालयांमध्ये संबंधित आस्थापना कार्यालय प्रमुखांनी प्राधिकृत केलेले अधिकारी व कर्मचारी यांना या आदेशाची अंमलबजावणी व दंडात्मक कारवाईकरिता प्राधिकृत करण्यात आले आहे.
सदर आदेश मनपा हद्दीतील शासकीय, निमशासकीय, खासगी, विविध मंडळे, परिमंडळे, महामंडळे, औद्योगिक, व्यावसायिक, वाणिज्य, शैक्षणिक, वैद्यकीय, रहिवासी क्षेत्र व संकुले, रेल्वे स्थानक, बस स्थानक, न्यायालयीन संस्था, देवस्थान, बगिचे, पर्यटनस्थळे, शॉपिंग मॉल, तरणतलाव, सिनेमागृह, व्यायामशाळा, रस्ते, बाजारपेठा, हॉटेल्स आदी संस्था, आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी अथवा आवारात लागू राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: A fine of Rs 200 for not wearing a mask in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.